Pune Zilla Parishad election 2026 : छाननीत उमेदवारी अर्ज बाद झाल्याने ७१ जणांचा झेडपी, पंचायत समिती निवडणुकीतील 'पत्ता' कट! 

झेडपीचे २४ तर, पंचायत समित्यांचे ४७ उमेदवार बाद : अर्ज माघारी घेण्याची मुदत सुरू 

Pune Zilla Parishad election 2026 : छाननीत उमेदवारी अर्ज बाद झाल्याने ७१ जणांचा झेडपी, पंचायत समिती निवडणुकीतील 'पत्ता' कट! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २३ जानेवारी २०२६ :- पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ७१ उमेदवारांचा पत्ता कट झाला आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीत या सर्व ७१ जणांचे मिळून एकूण ८६ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या २४ आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत उतरलेल्या ४७ उमेदवारांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या २४ उमेदवारांचे २८ आणि पंचायत समित्यांच्या ४७ उमेदवारांचे ५८ उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या जिल्हा समन्वयक डॉ. चारूशीला देशमुख-मोहिते यांनी दिली. 

दरम्यान, शुक्रवारपासून (दि.२३ जानेवारी) उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत सुरू झाली आहे. यानुसार निवडणूक रिंगणातून बाहेर पडू इच्छिणाऱ्या उमेदवारांना येत्या दि. २७ जानेवारीपर्यंत माघार घेता येणार आहे. मात्र येत्या रविवारी (दि.२५ जानेवारी) सार्वजनिक तर, सोमवारी (दि.२६ जानेवारी)प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने या दोन्ही दिवशी उमेदवारी अर्ज माघार घेता येणार नाहीत. छाननीत अर्ज बाद झालेल्या झेडपीच्या उमेदवारांमध्ये १९ पुरुष व ५ महिला आणि पंचायत समित्यांच्या उमेदवारांमध्ये २४ पुरूष आणि २३ महिलांचा समावेश असल्याचे देशमुख-मोहिते यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१९ जागांसाठी १८०६ जणांनी तब्बल २३३५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची गुरुवारी (दि.२२ जानेवारी) छाननी करण्यात आली. या छाननीत हे ८६ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. पुणे जिल्हा परिषदेचे ७३ गट व जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या १४६ अशा एकूण २१९ जागांसाठी ही निवडणूक होत असून, यासाठी येत्या ५ फेब्रुवारीला मतदान घेण्यात येणार आहे. दाखल झालेल्या एकूण उमेदवारी अर्जांमध्ये जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठीच्या ८५३ तर, जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठीच्या १४८२ अर्जांचा समावेश होता. यानुसार जिल्हा परिषद गटांसाठी ६४१ जणांनी ८५३ तर पंचायत समित्यांच्या गणांसाठी ११६५ जणांनी १४८२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 

पुणे जिल्ह्यातील २२४९ उमेदवारी अर्ज वैध 

दरम्यान, उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आता जिल्हा परिषदेसाठी ६२१ उमेदवारांचे ८२५ व पंचायत समित्यांसाठीच्या ११२२ जणांच्या १४२४ असे एकूण २२४९ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज वैध ठरलेल्या ६२१ उमेदवारांमध्ये ३५८ पुरूष व २६७ महिला आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्ज वैध ठरलेल्या ११२२ जणांमध्ये ६२७ पुरुष व ४९५ महिला उमेदवारांचा समावेश आहे. 

येत्या २७ जानेवारीला उमेदवारी अंतिम यादी अन् चिन्ह वाटप 

दरम्यान, शुक्रवारी (दि.२३ जानेवारी) सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्ज माघार घेण्यास सुरुवात झाली आहे. ही मुदत येत्या २७ जानेवारी रोजी दुपारी तीनपर्यंत असणार आहे. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर त्याच दिवशी दुपारी निवडणूक रिंगणात शिल्लक राहिलेल्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. शिवाय उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाणार आहे.