Outstanding Engineer Award Distribution : मैथिली झांजुर्णे-बरामदे, हेमा कुलकर्णी, पाटील, कोकणे, घोगरे, कुंभार, रेपाळे, मेटेकर, शिंदे यांचा उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने गौरव!
पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे सन्मान : पुणे झेडपीतील हेमा कुलकर्णी यांचा समावेश
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २८ सप्टेंबर २०२५ :- राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभात पंतप्रधान ग्रामसेवक योजना विभागाच्या अधीक्षक अभियंता मैथिली झांजुर्णे-बरामदे, पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या प्रभारी उपकार्यकारी अभियंता हेमा कुलकर्णी, रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता शैलजा पाटील, जलसंपदा विभागाचे उपअभियंता दत्तात्रेय कोकणे, उपअभियंता कोमल घोगरे, सुर्यकांत कुंभार, शाखा अभियंता गणेश रेपाळे, योगेश मेटेकर, विजय शिंदे आणि विशाल पाटील यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त उत्कृष्ट अभियंता पुरस्कार दिले जातात. या संघटनेच्या वतीने यंदाच्या वर्षीच्या पुरस्कारांत सरकारी सेवेतील विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्याच्या उत्कृष्ट कामाची दखल घेण्यात आली. या पुरस्कारांच्या मानकऱ्यांमध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील शाखा अभियंता हेमा कुलकर्णी यांचाही समावेश आहे.
भारतात दरवर्षी १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिन सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन साजरा केला जातो. यानिमित्ताने अभियंत्यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव केला जातो. नवकल्पना आणि समस्या सोडविण्यासाठी त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले जाते. यानुसार पुणे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे दरवर्षी अभियंता दिनानिमित्त उत्कृष्ट अभियंता पुरस्कार जाहीर केले जातात आणि यानिमित्ताने आयोजित समारंभात उत्कृष्ट अभियंत्यांचा या पुरस्काराने गौरव केला जातो. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यानिमित्ताने संघटनेच्या वतीने अभियंत्यांसाठी अनुभवी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनही आयोजित केले जाते.
जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अविनाश सुर्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त सचिव सदाशिव साळुंखे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजयकुमार माळी, कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्र कुमार काटकर, उज्वला घावटे, पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र भोसले आदींसह अनेक वरिष्ठ अधिकारी व कंत्राटदार उपस्थित होते. यावेळी उद्योजक देविदास गायकवाड,विक्रम शिंदे, कर्मचारी वृषाली गार्डे, विकास मोरे, प्रशांत वाघ, प्रीतम सोनवणे,अनिल काकडे, बिल्डर्स असोसिएशनचे सुनिल मते यांचा विशेष सम्मान काण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना सदाशिव साळुंखे यांनी भारतरत्न सर विश्वेश्ववरय्या यांच्या कामाची माहिती देऊन त्यांचे युग अंगी बाळगून सरकारी अभियंत्यांनी व कंत्राटदारांनी वाटचाल करावी, असा सल्ला दिला.बदलत्या वातावरणाचा परिणाम,अतिवृष्टी, महाराष्ट्रातील सिंचन व्यवस्था,धरणांचे,कालव्यांचे बांधकाम, काँक्रीटचा अतिवापर आदी विषयांबाबत सखोल माहिती देऊन पर्यावरणसंबंधी काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत अविनाश सुर्वे यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्रकुमार काटकर यांनी यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वाटचालीविषयी माहिती दिली. संघटनेचे अध्यक्ष रविंद्र भोसले यांनी सर्वांचे स्वागत करत, चांगल्या अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक व्हावे, या उद्देशाने दरवर्षी हे पुरस्कार दिले जात असल्याचे सांगितले.
दर्जेदार कामे करा - रवींद्र भोसले
कंत्राटदारांनी दर्जेदार व उत्तम पद्धतीने विकासकामे पूर्ण केली पाहिजेत. एखाद्या विकासकामांचे सरकारी कंत्राट मिळाले की, त्यात जास्त पैसे कसे कमावता येतील, हे न पाहता ते काम दर्जेदार कसे होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे पैसे मिळवण्यासाठी काम करू नका. चांगले काम करा. पैसे आपोआप मिळतात, असा सल्ला संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भोसले यांनी यावेळी कंत्राटदारांना दिला.
