Pune Zp committee Precident election : पुणे जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीसाठी सहा तालुक्यांचे पारडे जड! 

पारडे जड असलेल्या सहापैकी चार तालुक्यांना सभापतीपद : ऐनवेळी बारामती तालुक्यालाही संधी मिळण्याची शक्यता? 

Pune Zp committee Precident election : पुणे जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीसाठी सहा तालुक्यांचे पारडे जड! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २७ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या विविध चार विषय समित्यांच्या सभापती पदांसाठी पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यांचे पारडे जड झाले आहे. यामध्ये मावळ, मुळशी, जुन्नर, खेड, हवेली आणि शिरूर  या सहा तालुक्यांपैकी कोणत्या दोन तालुक्यांचा पत्ता कट होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पुणे जिल्ह्यात पुणे शहर वगळता एकूण तेरा तालुके आहेत. या तेरा तालुक्यांसाठी साडेतीन लोकसभा आणि दहा विधानसभा मतदारसंघ आहेत. साडेतीन लोकसभा मतदारसंघात पुणे शहर लोकसभा मतदारसंघ वगळल्यास जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अडीच लोकसभा मतदारसंघ येत आहेत. यामध्ये बारामती, शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांचा तर, मावळ या अर्ध्या लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. कारण मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्हा मावळ, पिंपरी व चिंचवड हे तीन विधानसभा मतदारसंघ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत व उरण हे तीन विधानसभा मतदारसंघ येतात.

जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांचे चार सभापती अशी पदाधिकाऱ्यांची एकूण सहा पदे आहेत. या सहापैकी अध्यक्षपद हे बारामती तर, उपाध्यक्षपद शिरूर लोकसभा मतदारसंघाला देण्यात आले आहे. उर्वरित चारपैकी एक सभापतीपद अर्धा लोकसभा मतदारसंघ असलेल्या मावळ तालुक्याला देण्यावर पक्ष नेतृत्वाने शिक्कामोर्तब केले असल्याचे समजते आहे. 
 
बारामती लोकसभेत आणखी दोन पदे जाणार? 

दरम्यान, अध्यक्षपदासह तीन पदे बारामती लोकसभा मतदारसंघात देण्याचा हालचाली पक्ष पातळीवर सुरू झाल्या आहेत. यानुसार दौंड तालुक्याला आधीच अध्यक्षपद देण्यात आलेले आहे. याशिवाय आणखी दोन सभापतीपदे ही बारामती लोकसभा मतदारसंघात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या दोन पदांसाठी मुळशी,भोर, इंदापूर आणि बारामती या चार तालुक्यात जोरदार स्पर्धा होणार आहे. तरीसुद्धा यापैकी बारामती व मुळशी या दोन तालुक्यांना प्रत्येकी एक सभापतीपद मिळण्याची शक्यता असून भोर व इंदापूर तालुक्याचा पत्ता कट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. 

मावळ तालुक्याला एक सभापतीपद मिळणार?

पुणे जिल्ह्यातील अर्धा लोकसभा मतदारसंघ असलेल्या मावळ लोकसभेत केवळ मावळ हा एकच तालुका व विधानसभा मतदारसंघ येत असून, पिंपरी व चिंचवड हे दोन विधानसभा मतदारसंघ हे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येत आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात एका पदासाठी एकच तालुका असल्याने या तालुक्याला एक सभापतीपद मिळणार आहे. 

शिरूर लोकसभेत एका पदासाठी चार तालुक्यांतील रस्सीखेच! 

दरम्यान, शिरूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा फक्त परिषदेची फक्त दोनच पदे दिली जाणार आहेत. यापैकी याआधी या लोकसभा मतदारसंघातील आंबेगाव तालुक्याला उपाध्यक्षपद देण्यात आलेले आहे. त्यामुळे आता या लोकसभा मतदारसंघात एकच सभापतीपद दिले जाणार आहे. या एका पदासाठी शिरूर, हवेली, खेड आणि जुन्नर या चार तालुक्यात मोठी रस्सीखेच होणार आहे.