Schedule of lottery for reservation of reserved seats for ZP election declared : जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या गट आणि गणांची येत्या १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत!
आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार?
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १ ऑक्टोबर २०२५ :- ... अखेर राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या अनुक्रमे गट आणि गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम बुधवारी (दि.१ ऑक्टोबर) जाहीर केला आहे. यानुसार येत्या १३ ऑक्टोबरला गट आणि गणांच्या आरक्षण सोडती काढण्याचा आदेश निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. यानुसार जिल्हा परिषद गट व पंचायत समिती सभापतींचे आरक्षण हे जिल्हा पातळीवर व पंचायत समित्यांच्या गणांचे आरक्षण हे आपापल्या तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. या वृत्ताला निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक आयोग आता लागला कामाला लागला आहे. यामुळे राज्यात लवकरच झेडपी निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. मागील तीन वर्षांपासून या निवडणुकीसाठी असलेली प्रतिक्षा आता संपणार आहे.
या कार्यक्रमानुसार राज्यातील ३२ झेडपी आणि ३३६ पंचायत समित्यांच्या अनुक्रमे गट आणि गणांची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार याद्यांचा कार्यक्रम याआधीच जाहीर करण्यात आला असून, या कार्यक्रमानुसार येत्या ८ ऑक्टोबरला प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. यामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचा समावेश आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे ७३ गट आणि तेरा पंचायत समित्यांचे मिळून एकूण १४६ गण आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत हीच संख्या अनुक्रमे ७५ आणि १५० इतकी होती. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ३४ गावे महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्याने आणि काही ग्रामपंचायतींचे नगरपालिका व नगरपंचायतीत रुपांतर झाल्याने गटांची संख्या दोनने तर, गणांची संख्या चारने कमी झाली आहे.
महाराष्ट्रातील २६ जिल्हा परिषदा आणि २८६ पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल अनुक्रमे दि. २० मार्च आणि दि. १३ मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. दरम्यान, त्यानंतर पुन्हा आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे.
गट आणि गणांच्या आरक्षण सोडतीचा सविस्तर कार्यक्रम
- दि. ६ ऑक्टोबर --- अनुसुचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी जागा निश्चित करुन विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविणे.
- दि. ८ ऑक्टोबर --- अनुसुचित जाती व अनुसुचित जमातीसाठी राखीव जागांचा प्रस्ताव मंजूर करणे.
- दि. १० ऑक्टोबर --- आरक्षण सोडतीची अधिसूचना प्रसिद्ध करणे.
- दि. १३ ऑक्टोबर --- गट आणि गणांची आरक्षण सोडत काढणे.
- दि. १४ ऑक्टोबर --- प्रारुप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध करणे.
- दि. १४ ते १७ ऑक्टोबर --- प्रारुप आरक्षणावर हरकती व सूचना दाखल करणे.
- दि. २७ ऑक्टोबर --- हरकती व सूचनांचा गोषवारा विभागीय आयुक्तांकडे सादर करणे.
- दि. ३१ ऑक्टोबर --- गट आणि गणांचे आरक्षण अंतिम करणे.
- दि. ३ नोव्हेंबर --- अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध करणे.
