Pune Zp precident election : पुणे झेडपीच्या नव्या सभागृहाची पहिली सर्वसाधारण सभा येत्या बुधवारी, नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणार! 

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी सभेचे अध्यक्षस्थान भूषविणार : झेडपीच्या नवीन सभागृहाचा कार्यकाल सुरू होणार

Pune Zp precident election : पुणे झेडपीच्या नव्या सभागृहाची पहिली सर्वसाधारण सभा येत्या बुधवारी, नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणार! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १७ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या नवीन म्हणजेच सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पंचवार्षिक सभागृहाची पहिली विशेष सर्वसाधारण सभा येत्या बुधवारी (दि. १८ मार्च) आयोजित करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा सुरू होणार आहे. या सभेतच जिल्हा परिषदेचे नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जाणार आहेत. ही विशेष सर्वसाधारण सभा बुधवारी दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे.

महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेच्या नवीन सभागृहाच्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेत नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड केली जाते. शिवाय याच विशेष सर्वसाधारण सभेपासून जिल्हा परिषदेचे नवीन सभागृह अस्तित्वात येत असते. या तरतुदीनुसार पुणे जिल्हा परिषदेच्या नवे सभागृह हे दि. १८ मार्च २०२६ पासून अस्तित्वात येणार आहे. 

जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी या विशेष सर्वसाधारण सभेची विषयपत्रिका प्रसिद्ध केली आहे. यानुसार बुधवारी दुपारी तीन वाजता ही सभा सुरू होणार असून, याच सभेत नवे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले जाणार असल्याचे या विषयपत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. या सभेत साध्या बहुमताच्या आधारे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड जाहीर केली जाणार आहे. 

अध्यक्ष, उपाध्यक्षांसाठी सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार 

दरम्यान, नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. हे अर्ज दाखल करण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीसाठीची प्रक्रिया ही बुधवारी सकाळी ११ वाजताच सुरू होणार आहे. 

नवनिर्वाचितांना ३९ दिवसांनंतर मिळणार अधिकृत झेडपी सदस्यांचा दर्जा 

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील तरतुदीनुसार नवीन सभागृहाच्या पहिल्या विशेष सर्वसाधारण सभेपासून जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल सुरू होत असतो. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांना दि. १८ मार्च २०२६ रोजी खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद सदस्यांचा दर्जा प्राप्त होणार आहे. या निवडणुकीचा निकाल दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजीच जाहीर झाला आहे. याला आता ३९ दिवस झाले आहेत. त्यामुळे निवडणूक निकालानंतर तब्बल ३९ दिवसांनी नवनिर्वाचित सदस्य हे अधिकृतपणे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून ओळखले जाणार आहेत.