Zilla Parishad election voter list : महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार याद्या तत्काळ उपलब्ध करून द्या!
राज्य निवडणूक आयोगाचा सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश : प्रत्येक पानासारखी २ रुपये मोबदला भरावा लागणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १० डिसेंबर २०२५ :- महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या मतदान केंद्राच्या याद्या आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी व नागरीकांना तत्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या मतदार याद्या उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक पानासाठी दोन रुपयांप्रमाणे मोबदला आकारण्यात यावा, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. यामुळे राजकीय पक्षांना मतदान केंद्र याद्या आणि मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकांमुळे लांबणीवर पडल्या आहेत. मात्र राज्य निवडणूक आयोगाने तत्पूर्वीच या निवडणुकीची पूर्वतयारी पूर्ण केली होती. यानुसार याबाबतच्या मतदान केंद्र आणि जिल्हा परिषद गट निहाय अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. या अंतिम मतदार याद्या राजकीय पक्ष, त्यांचे प्रतिनिधी किंवा नागरिकांना उपलब्ध करुन दिल्या जातात. मात्र याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकांमुळे राज्यातील काही जिल्हाधिकाऱ्यांनी या अंतिम मतदार याद्या उपलब्ध करून देण्यास नकार दिला होता. राज्य निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली नसल्याचे कारण दिले जात होते.
या अंतिम मतदार याद्या उपलब्ध करून द्याव्यात की नाही, याबाबत मार्गदर्शन करण्याची मागणी राज्यातील काही जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली होती. या मागणीनुसार राज्य निवडणूक आयोगाने हा आदेश दिला आहे. दरम्यान, याआधी राज्य निवडणूक आयोगाने दि.०८ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या पत्राद्वारे स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतराज संस्थांच्या निवडणुकीकरिता अंतिम मतदार याद्यासह छायाचित्र प्रती पान दोन रुपयांंची आकारणी करुन उपलब्ध करून देण्याबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कळविले होते.
