Last farewell to senior social worker Dr. Baba Adhav : 'जब तक सूरज, चॉंद रहेगा, तब तक बाबा तुम्हारा नाम रहेगा',च्या जयघोषात कष्टकऱ्यांचा आधारवड 'बाबां'ना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप!
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव पंचत्वात विलीन : कोणतेही धार्मिक विधी न करता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ९ डिसेंबर २०२५ :- कष्टकरी, श्रमिक, गरीब, वंचित आदी वर्गाकरिता संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे आणि रिक्षा पंचायत, हमाल पंचायत, माथाडी, असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक, सत्यशोधक चळवळीचे ज्येष्ठ नेते, गांधीवादी विचारवंत आणि समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.९ डिसेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत कोणतेही धार्मिक विधी न करता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी 'जब तक सूरज, चॉंद रहेगा, तब तक बाबा तुम्हारा नाम रहेगा',च्या जयघोषात चाहत्यांनी आणि कुटुंबियांनी कष्टकऱ्यांचा आधारवड 'बाबां'ना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला आणि डॉ. बाबा आढाव पंचत्वात विलीन झाले.
डॉ. बाबा आढाव यांचे सोमवारी (दि. ८ डिसेंबर) रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.९ डिसेंबर) पुणे येथील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित होते.पवार यांनी यावेळी डॉ. आढाव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. शिवाय त्यांनी आढाव यांच्या पत्नी शीलाताई आढाव, मुलगा असीम आढाव, अंबर आढाव आदी उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी डॉ. आढाव यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, सुषमा अंधारे,आमदार चेतन तुपे, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, माजी महापौर अंकुश काकडे, राजलक्ष्मी भोसले, डॉ.अभिजीत वैद्य, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आणि कामगार नेते नितीन पवार, किशोर ढमाले, पोलीस उपायुक्त श्रषिकेश रावल, उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, पुणे शहर तहसीलदार स्मिता माने, हवेली तहसीलदार अर्चना निकम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा स्मरणात ठेवून डॉ . बाबा आढाव यांनी त्यादृष्टीने आयुष्यभर वाटचाल केली. एक संघर्षयोद्धा म्हणून त्यांना भारतासह महाराष्ट्राने अनुभवले आहे.आजचा प्रसंग कोणाच्या बाबतीत घडू नये, पण काळाच्या ओघात मनुष्य आपल्यातून जात असतो. वंचित आणि उपेक्षित लोकांसाठी बाबांनी आपले आयुष्य समर्पित केलं आहे. हमाल पंचायत, रिक्षा पंचायत, कामगार संघटना या माध्यमातून त्यांनी सातत्याने काम केले आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा त्यांनी नेहमी अंमलात आणली. राज्यातील १३ कोटी जनतेच्यावतीने मी त्यांना श्रद्धांजली वाहतो, अशा शब्दांत अजित पवार यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.
डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना दोन आठवड्यांपूर्वी पूना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हृदयाशी संबंधित समस्येमुळे डॉ. आढाव यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते आणि त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. डॉ. आढाव यांची प्रकृती चिंताजनक झाल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या पृकृतीची विचारपूस केली होती. यावेळी शरद पवार यांनी वैद्यकीय पथकाकडून बाबा आढाव यांच्या तब्येतीची माहिती जाणून घेतली होती.
दरम्यान, मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून डॉ. बाबा आढाव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे ठेवण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री हुसेन दलवाई, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर, आमदार रोहित पवार, माजी आमदार व 'उपरा'कार लक्ष्मन माने, डॉ. भारत पाटणकर, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या प्रतिभा शिंदे आदींनी डॉ आढाव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
येत्या शुक्रवारी (दि.१२ डिसेंबर) श्रद्धांजली सभेचे आयोजन
दरम्यान, येत्या शुक्रवारी (दि.१२ डिसेंबर) डॉ. बाबा आढाव या़ंची श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. ही श्रद्धांजली सभा दि.१२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आली असल्याचे कामगार नेते नितीन पवार यांनी यावेळी जाहीर केले.
