Pune Zp Budget: पुणे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धीमता,सायन्स पार्क, कौशल्य विकास, सोलर पार्क, मॉडेल स्कूल आदींसह ३० अनोख्या योजनांचा समावेश!
झेडपीच्या प्रशासकांकडून सन २०२६-२७ चा ३०१ कोटींचा जमेचा अर्थसंकल्प मंजूर, गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ कोटींची वाढ : बदलता काळ अन् बदलत्या तंत्रज्ञानावर अधिक भर असलेला राज्यातील आगळावेगळा अर्थसंकल्प
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १७ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात कृत्रीम बुद्धिमत्ता (ए.आय.), सायन्स पार्कची उभारणी, कौशल्य विकास केंद्र स्थापन करणे, सोलर पार्कची निर्मिती करणे, सामुदायिक अक्षय उर्जा केंद्र उभारणे, मॉडेल स्कूल व मॉडेल आरोग्य केंद्र निर्माण करणे, अनुभव केंद्र व जिल्हा डेटा सेंटरची उभारणी करणे, पिंक रुमची उभारणी करणे, घे भरारी, फिरते शॉपी योजना आणि सावित्री कॅफेची आदींसह विविध ३० नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश असलेला अनोखा अर्थसंकल्प झेडपीचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मंगळवारी (दि. १७ मार्च) सादर केला. या अर्थसंकल्पात गजानन पाटील यांनी बदलत्या काळानुसार आणि बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर अधिक भर दिला आहे. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेचा हा अर्थसंकल्प राज्यात आगळावेगळा आणि अनोखा ठरणार आहे.
जिल्हा परिषदेचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा हा एकूण ३०१ कोटी रुपयांचा जमेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. सलग सहाव्या वर्षी जिल्हा परिषदेचा जमेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तुलनेत (सन २०२५-२६) आगामी वर्षांच्या मूळ अर्थसंकल्पात ९ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाचा मूळ अर्थसंकल्प हा २९२ कोटी कोटी ७५ लाख रुपयांचा होता. दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या तिजोरीत सध्या अवघे २९ कोटी ६५ लाख रुपये शिल्लक राहिले आहेत. यामुळे जिल्हा परिषदेला आगामी आर्थिक वर्षासाठीचा (२०२६-२७) हा जमेचा अर्थसंकल्प सादर करावा लागला आहे. यावेळी चालू आर्थिक वर्षाच्या (सन २०२५-२६) ४५५ कोटी रुपयांचा सुधारित अर्थसंकल्पालाही मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी मंगळवारी (दि. १७ मार्च) आगामी आर्थिक वर्षाचा (२०२६-२७) मूळ अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, या सर्वसाधारण सभेत चालू आर्थिक वर्षाचा (२०२५-२५) ४५५ कोटी रुपयांचा अंतिम सुधारित अर्थसंकल्पही सादर करण्यात आला. आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात आरंभीची शिल्लक रक्कम २९ कोटी ६५ लाख रुपयांची आहे. शिवाय २७२ कोटी रुपयांचा जमेचा अंदाज गृहित धरण्यात आला आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू-धोटे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी (कॅफो) विशाल पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भूषण जोशी आदींसह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
विभागनिहाय प्रस्तावित तरतुदींना फाटा
दरम्यान, जिल्हा परिषदेचे नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांची येत्या बुधवारी (दि.१८ मार्च) निवड होत आहे. यामुळे मंगळवारी प्रशासकराजचा शेवटचा दिवस होता. बुधवारपासून नवे सभागृह अस्तित्वात येत आहे. या पार्श्वभूमीवर विभागनिहाय आणि योजनानिहाय निधीची तरतूद करण्याची संधी नव्या सभागृहाला मिळावी, या उद्देशाने प्रशासक गजानन पाटील यांनी मंगळवारी सादर केलेल्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात विभागनिहाय प्रस्तावित तरतुदींना फाटा दिला आहे.
अर्थसंकल्पातील नाविन्यपूर्ण उपक्रम व योजना
- जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक व विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धीमतेचे (ए.आय.) प्रशिक्षण देणे.
- पुणे जिल्ह्यात दोन विज्ञान केंद्र (सायन्स पार्क) उभारणे.
- कौशल्य विकास केंद्र (स्किल सेंटर) उभारणे.
- दिव्यांगांसाठी उपजिविका सहाय्य करणे.
- जिल्ह्यातील एकल महिलांसाठी माझे अस्तित्व योजना सुरू करणे.
- जिल्हा परिषद फेलोशिप कार्यक्रम राबविणे.
- विद्यार्थ्यांच्या मानसिक, बौद्धिक वाढीसाठी ध्यान व योगसाधना.
- गावांमध्ये सोलर पार्क उभारणे.
- घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करणे.
- कम्युनिटी बॉयोगॅस प्रकल्प निर्माण करणे.
- जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची इस्त्रो, नासा, युरोपियन स्पेस सेंटर येथे वैज्ञानिक सहल आयोजित करणे.
- 'निपुण पुणे' या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे.
- जिल्ह्यात समाजमंदिर ते ज्ञान मंदीर योजना सुरू करणे.
- मॉडेल स्कूल व मॉडेल आरोग्य केंद्र निर्माण करणे.
- बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करणे.
- अनुभव केंद्र (Experience centre) स्थापन करणे.
- जिल्हा डेटा सेंटरची उभारणी करणे.
- शालेय विद्यार्थीनींसाठी पिंक रुम सुरू करणे.
- झेडपी शाळांमध्ये बाल संसद उपक्रम सुरू करणे.
- विद्यार्थ्यांसाठी ज्ञान सेतू कार्यक्रम (Student exchange programme) सुरू करणे.
- निवडक जिल्हा परिषद शाळा 'सीबीएसई' शिक्षण मंडळाशी संलग्न करणे.
- 'ग्लोबल गुरुजी' उपक्रम राबविणे.
- इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन व अक्षय उर्जा मॉडेल केंद्रांची स्थापना करणे.
- झेडपी शाळांमध्ये इंग्रजी भाषा कौशल्य वृद्धी कार्यक्रम सुरू करणे.
- महिला बचत गटांच्या महिलांचा दुबई शॉपिंग फेस्टिव्हलमध्ये सहभाग वाढविणे.
- जिल्हा ग्रामीण संशोधन केंद्र (District rural innovation centre) उभारणे.
- फिरते शॉपी योजना सुरू करणे.
- सावित्री कॅफे सुरू करणे.
अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
- आरंभीची शिल्लक ---- २९ कोटी ६५ लाख रुपये.
- सन २०२६-२७ मधील जमेचा अपेक्षित अंदाज ---- २७२ कोटी रुपये.
- सन २०२६-२७ साठीचा एकूण जमेचा अर्थसंकल्प ---- ३०१ कोटी रुपये.
- सन २०२६-२७ चे खर्चाचे मूळ अंदाजपत्रक --- १८४ कोटी रुपये.
थोर समाजसुधारक महात्मा जोतीराव फुले यांचे यंदा द्विशताब्दी जयंती वर्ष आहे. या वर्षाच्या निमित्ताने पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात शिक्षण, आरोग्य, महिला व पशुसंवर्धन आदी विषयांना प्राधान्य दिले आहे. आगामी वर्षात जिल्हा परिषदेच्या ६०६ शाळा या मॉडेल स्कूल करणार आहोत.
- गजानन पाटील, प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे.
