Program on the occasion of Dhamma Chakra Pravartan Day in Nanded City : गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दीप पुढील पिढीकडे नेणे ही प्रत्येकाची जबाबदारी!
प्रसिद्ध साहित्यिक व 'उपरा'कार लक्ष्मण माने यांचे प्रतिपादन : नांदेड सिटीत धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ११ ऑक्टोबर २०२५ :- गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा दीप पुढील पिढीकडे नेणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले पाहिजेत. तरच खऱ्या अर्थाने समाज परिवर्तन होईल. जे मागे राहिले आहेत, अशांना आपले मानून, त्यांना हात धरून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंबेडकरी समुदायाने प्रयत्न करावेत. ती तुमची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व 'उपरा'कार लक्ष्मण माने यांनी येथे एका जाहीर कार्यक्रमात बोलताना केले.
पुण्यातील बहुजन हिताय संघ आणि नांदेड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र प्रवर्तनदिनी नांदेड सिटीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी प्रा. माने बोलत होते.यावेळी प्रा. डॉ. सुभाष खंडागळे, संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.“बुद्धाने करुणा,अहिंसा आणि समतेचा जो मार्ग दाखवला, त्याची आज नितांत गरज आहे जातीय विषमता, हिंसा आणि अन्याय यांच्या छायेत आजचे जग जगत आहे. अशा परिस्थितीत ‘माणसाला माणूस म्हणून वागविणे हाच खरा धर्म’ हे बुद्धांचे तत्वज्ञान आपल्याला मार्गदर्शक ठरते,” असेही ते म्हणाले.
प्रा. माने पुढे म्हणाले, "संविधान हा केवळ कायदेशीर दस्तऐवज नाही तर, तो सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समानतेची हमी आहे. जर समानता मिळाली नाही तर, लोकशाही ही केवळ कागदावर राहील. भटक्या जमाती आजही शिक्षण,आरोग्य, रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्व या सर्वच क्षेत्रांत मागे आहेत. सरकारच्या अनेक योजना आहेत.मात्र त्या थेट गरजूंपर्यंत पोहोचत नाहीत. या समाजाचा मुख्य प्रवाहात समावेश हा केवळ सहानुभूतीचा प्रश्न नाही, तर लोकशाहीच्या आरोग्याची ती खरी कसोटी आहे.विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, वसतिगृह, उच्च शिक्षणाच्या संधी ही सुविधा नव्हे तर,न्यायाचा हक्क आहे."
