Obscene messages to female 'CEO's :- चक्क झेडपीच्या महिला 'सीईओं'नाच अधिकाऱ्याने अश्लील भाषेत पाठवले धमकीचे मेसेज!

दुसऱ्या विभागात बदली केल्याच्या रागातून कृत्य : 'सिईओं'कडून गंभीर दखल, अधिकारी तत्काळ निलंबित 

Obscene messages to female 'CEO's :- चक्क झेडपीच्या महिला 'सीईओं'नाच अधिकाऱ्याने अश्लील भाषेत पाठवले धमकीचे मेसेज!
पुणे :- व्हॉट्सॲपद्वारे मेसेज पाठविण्याबाबतचे ए. आय. ने तयार केलेले छायाचित्र.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ११ सप्टेंबर २०२५ :- भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय ए.एस.) महिला अधिकाऱ्यालाच व्हॉट्सॲपद्वारे अश्लील भाषेत धमकीचे संदेश (मेसेज) पाठविण्याचा प्रकार महाराष्ट्रातील एका जिल्हा परिषदेत (झेडपी) घडला आहे. झेडपीतील ज्या महिला अधिकाऱ्याला हे अश्लील मेसेज पाठविण्यात आले आहेत, त्या महिला अधिकारी या संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सिईओ)आहेत. चक्क 'सिईंओं'च अश्लील भाषेत मेसेज पाठविण्याच्या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे अश्लील भाषेतील मेसेज पाठविणारा व्यक्ती हा दुसरा -तिसरा कोणी नसून, त्या जिल्हा परिषदेतील एक जबाबदार अधिकारी आहे. या अधिकाऱ्याने मध्यरात्री दोन वाजता संबंधित महिला 'सिईंओं'ना हे अश्लील मेसेज पाठविले असल्याचे उघड झाले आहे. मराठवाड्यातील एका नामवंत जिल्हा परिषदेत हा प्रकार घडला आहे. 

झेडपीच्या महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याची दुसऱ्या विभागात  बदली केल्याने त्याने या रागातून हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. दरम्यान, या घटनेची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून,याप्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यास तत्काळ निलंबित केले आहे. सिईंओंनी संबंधित अधिकाऱ्याची दुसऱ्या विभागात बदली केल्याच्या रागातून एका अधिकाऱ्याने महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या मोबाईलवर आणि खातेप्रमुखांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे अश्लील आणि धमकी देणारे मेसेज पाठविले असल्याचे आढळून आले आहे.

या प्रकरणी निलंबित करण्यात आलेला अधिकाऱ्याचे नाव आनंद सावंत असे आहे. आनंद सावंत हे संबंधित जिल्हा परिषदेत कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर कार्यरत होते.सिईंओंनी त्यांची नुकतीच दुसऱ्या विभागात बदली केली होती.या बदलीमुळे सावंत हे नाराज होते. त्यांनी याबाबतची नाराजी अनेकांसमोर व्यक्त केली होती.शिवाय या बदलीने सावंत यांचा पारा चांगलाच चढला होता. या रागातूनच  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर हे अश्लील मेसेज पाठवले. हे मेसेज पाठवताना त्यांनी काही राजकीय नेत्यांची ओळख सिईओंना सांगितल्याचे संबंधित जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.