Pune Zilla Parishad election 2025 : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी समन्वयाने काम करा! 

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा आदेश : जिल्हा परिषद निवडणूक पूर्वतयारीचा घेतला आढावा 

Pune Zilla Parishad election 2025 : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी समन्वयाने काम करा! 
पुणे:- पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, जिल्हा परिषद निवडणूक समन्वयक व उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख-मोहिते आदी.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १४ नोव्हेंबर २०२५ :- पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत समन्वयाने काम करण्याचा आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शुक्रवारी (दि.१४ नोव्हेंबर) जिल्ह्यातील सर्व विभागांना दिला‌ आहे. यामुळे जिल्हा परिषदेची आगामी सार्वत्रिक निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होण्याचे संकेत मिळाले आहेत. 

पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी शुक्रवारी पुणे जिल्हा  परिषद आणि जिल्ह्यातील तेरा पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेतला‌‌. या आढावा बैठकीत बोलताना डुड्डी यांनी हा आदेश दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या या बैठकीत डुड्डी यांनी विभागनिहाय नेमलेल्या नोडल (समन्वयक)अधिकाऱ्यांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. ही निवडणूक प्रक्रिया निर्दोष, शांततामय आणि कार्यक्षम पद्धतीने पार पडावी, या दृष्टीने सर्वांनी काम केले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी  ज्योती कदम, पुणे जिल्हा परिषद आणि तेरा पंचायत समिती निवडणुकीच्या जिल्हा समन्वयक (प्रमुख नोडल अधिकारी) चारूशिला देशमुख-मोहिते आणि विविध विभागांचे समन्वयक अधिकारी उपस्थित होते.

या आढावा बैठकीत जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वेळेत पूर्ण करणे, आवश्यक मनुष्यबळाची नियुक्ती, निवडणूक साहित्य उपलब्धता, ईव्हीएम मशिन तपासणी, आणि मतदान केंद्रांसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली. शिवाय प्रत्येक विभागाने आपापल्या जबाबदाऱ्या शून्य त्रुटी तत्त्वावर पूर्ण कराव्यात आणि रोजच्या रोज आपापल्या कामाच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा‌. सर्व स्तरांवर योग्य तो समन्वय ठेवून निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी, अशी सूचना  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी केली. 

'संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्राच्या याद्या तयार करा' 

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील किती मतदान केंद्र संवेदनशील व अतिसंवेदनशील आहेत, याची खातरजमा करा आणि अशा मतदान केंद्रांची स्वतंत्र यादी तयार करा. जेणेकरून या मतदान केंद्रावर सुरक्षा यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याचे आदेश देता येतील. मतदान कर्मचाऱ्यांसाठीच्या वाहतूक व्यवस्था ही निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार पूर्ण ठेवाव्यात, असा आदेशही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी यावेळी दिला आहे.