Zilla Parisha elections in voter list Maharashtra : जिल्हा परिषदा व  पंचायत समिती निवडणुकीच्या अंतिम  मतदार याद्या खोळंबणार?

नियोजित कार्यक्रमानुसार सोमवारी प्रसिद्ध होणे अशक्य : निवडणूक आयोगाचे मुदतवाढीचे संकेत

Zilla Parisha elections in voter list Maharashtra : जिल्हा परिषदा व  पंचायत समिती निवडणुकीच्या अंतिम  मतदार याद्या खोळंबणार?
पुणे:- जिल्हा परिषदा, पंचायत समित्या निवडणुकीची मतदार यादी

डॉ. गजेंद्र बडे ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. २७ ऑक्टोबर २०२५ :- राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांच्या संगणकीय प्रणालीत (सॉफ्टवेअर) तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. यामुळे नियोजित कार्यक्रमानुसार सोमवारी (दि.२७ ऑक्टोबर) प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीच्या अंतिम मतदार याद्या खोळंबणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळे या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास राज्य निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, मतदार याद्यांबाबतच्या संगणकीय प्रणालीत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पाठोपाठ आता राज्य निवडणूक आयोगाच्या प्रणालीतही 'घोळ' निर्माण झाल्याने मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. 

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकी साठीच्या अंतिम मतदार याद्या सोमवारी (दि.२७ ऑक्टोबर) प्रसिद्ध करण्यात येणार होत्या. यासाठीच्या प्रारुप मतदार याद्या दि. ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. या प्रारुप मतदार याद्यांवर दि. १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या आणि या हरकती व सूचनांचे दि‌.२६ ऑक्टोबरपर्यंत निराकरण करुन दि. २७ ऑक्टोबर रोजी मतदान केंद्रनिहाय या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या.

यामध्ये पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या प्रारुप मतदार याद्यांचाही समावेश होता.  जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी दि. १ जुलै २०२५ अखेरपर्यंतची मतदारयादी ग्राह्य धरण्यात आली आहे. 

राज्यातील २६ जिल्हा परिषदा आणि २८६ पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल अनुक्रमे दि. २० मार्च आणि दि‌‌. १३ मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. त्यानंतर पुन्हा आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे.

निवडणूक आयोगाने बोलावली राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक 

दरम्यान, महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या संभाव्य सार्वत्रिक निवडणुकीच्या पुर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने येत्या गुरुवारी (दि. ३० ऑक्टोबर) राज्यातील सर्व जिल्ह्यांधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. ही बैठक गुरुवारी दुपारी दूरदृष्य प्रणालीच्या (व्हिडिओ कॉन्फरन्स) माध्यमातून ही बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्हा परिषद निवडणूक आचारसंहिता, निवडणूक कार्यक्रम प्रसिध्दी आदींबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.