The code of conduct will be implemented in area of municipal corporations from Monday : महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या कार्यक्षेत्रात सोमवारपासून आचारसंहिता लागू! 

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचाही समावेश : आचारसंहितेत काय करावे आणि काय करु नये, हे पहा 

The code of conduct will be implemented in area of municipal corporations from Monday : महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या कार्यक्षेत्रात सोमवारपासून आचारसंहिता लागू! 

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १५ डिसेंबर  २०२५ :- महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या कार्यक्षेत्रात सोमवारपासून (दि.१५ डिसेंबर २०२५) महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यामध्ये पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकांचाही समावेश आहे. ही आचारसंहिता महापालिकांच्या कार्यक्षेत्रापुरती मर्यादित असली तरी या कालावधीत अन्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातसुद्धा महापालिकांविषयीचे निर्णय घेण्यास किंवा त्याबाबतची घोषणा करण्यास या आचारसंहितेत बंदी घालण्यात आली आहे. ही आचारसंहिता येत्या १६  जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि. १५ डिसेंबर) राज्यांतील २९ महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार हा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासूनच राज्यात आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले आहे. 

या आचारसंहितेच्या कालावधीत काय करता येईल आणि काय करता येणार नाही, यांची मार्गदर्शक तत्वे राज्य निवडणूक आयोगाने निश्चित करुन दिलेली आहेत. शिवाय या आचारसंहितेचा भंग करणाऱ्या व्यक्ती, संस्था, राजकीय पक्ष, उमेदवार आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. 

आचारसंहितेत काय करावे आणि व काय करु नये

१) आचारसंहितेत "काय करता येईल"

- चालू असलेले कार्यक्रम व  योजना पुढे सुरु ठेवता येतील.

- त्याविषयी शंका निर्माण होईल, अशा बाबींच्या बाबतीत राज्य निवडणूक आयोग, महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण व  मान्यता प्राप्त करून घ्यावी.  

- पुर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी आवश्यक व पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील. शिवाय यासंदर्भात चालू असलेल्या योजना पुढे सुरू ठेवता येतील.

- मरणासम किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे काम समुचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल.

- मैदानासारख्या सार्वजनिक जागा या सर्व राजकीय पक्षांना किंवा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी निःपक्षपातीपणे उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. त्याप्रमाणे सर्व पक्षांना किंवा निवडणुकीस उभे असलेल्या उमेदवारांना हेलीपॅड नि:पक्षपातीपणे उपलब्ध करुन दिला पाहिजे.

- विश्रामगृहे, डाक बंगले व अन्य शासकीय निवासस्थाने वगैरेंच्या बाबतीत निवडणूक आयोगाने व त्या अनुषंगाने शासनाने काढलेल्या आदेशास संपूर्णतः अधीन राहून सर्व राजकीय पक्षांना किंवा निवडणुकीस उभे असलेल्या सर्व उमेदवारांना समानतेच्या तत्त्वावर उपलब्ध करून देता येणे अनुज्ञेय असल्यास त्याप्रमाणे देण्यात यावेत.

- इतर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर करण्यात येणारी टीका ही त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी,  पार पडलेली कामे केवळ या बाबींशी संबंधित असली पाहिजे. 

- शांततामय उपद्रवरहित गृहस्थ जीवन जगण्याच्या प्रत्येक व्यक्तीच्या अधिकारांचे पूर्णपणे जतन करण्यात यावे . 

- प्रस्तावित सभेची जागा व वेळ याविषयी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांना पूर्ण माहिती देण्यात यावी आणि त्यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेण्यात याव्यात. 

- प्रस्तावित सभेच्या जागी निर्बंधात्मक व प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेले असल्यास त्यांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. आवश्यक असल्यास याबाबत सवलत मिळण्याविषयी अर्ज केले पाहिजेत आणि वेळीच अशी सवलत मिळविली पाहिजे.

- प्रस्तावित सभेसाठी ध्वनिक्षेपक (Loudspear) किंवा कोणत्याही इतर अशा सवलतीचा वापर करण्यासाठी परवानगी घेतली पाहिजे.

- सभेमध्ये अडथळे आगणाऱ्या किंवा अव्यवस्था निर्माण करणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांचे सहकार्य घेण्यात यावे.

- कोणत्याही मिरवणुकीची प्रारंभीची जागा,मिरवणूक ज्या मार्गाने जाईल तो मार्ग व मिरवणुकीची अखेर होईल अशी वेळ व स्थान ही बाब आगाऊ स्वरुपात निश्चितपणे ठरविण्यात यावी आणि त्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांकडून आगाऊ परवानगी घेण्यात यावी.

- मिरवणूक ज्या वस्त्यांमधून जात असेल त्या वस्त्यांबाबत कोणतेही निर्बंधात्मक आदेश जारी केलेले असल्यास त्याविषयी खात्री करून त्याचे पूर्णपणे अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे सर्व वाहतूक नियमाचे व अन्य निर्बंधांचे अनुपालन करण्यात यावे.

- मिरवणुकीमुळे वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ देऊ नये.

-  ज्यांचा क्षेपके किंवा हत्यारे म्हणून गैरवापर होऊ शकेल, अशा कोणत्याही वस्तू मिरवणुकीत सहभागी असलेल्या व्यक्तींनी स्वतःजवळ बाळगू नयेत.

- मतदानाचे काम शांतता व सुव्यवस्थेने पार पड़ावे, यासाठी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात यावे. उमेदवार व त्यांच्या अधिकृत कार्यकर्त्यांनी विहित परवानगी घेऊन योग्य असे बिल्ले व ओळखपत्रे निवडणूक प्रशासनाकडून मिळवावीत व ती निवडणुकीचे काम करणाऱ्या व्यक्तींनी ती दर्शनी भागावर लावावीत.

- मतदारांना देण्यात येणाऱ्या निवडणूक चिट्ट्या या साध्या पांढऱ्या कागदावर देण्यात याव्यात व त्यावर कोणतेही चिन्ह, उमेदवाराचे किंवा पक्षाचे नाव यांचा उल्लेख नसावा.

- मतदानाच्या दिवशी वाहनांच्या वापरावरील निर्बंधांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. 

- राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका आयुक्त यांचे किंवा जिल्हाधिकाऱ्यांचे किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याने दिलेले वैध प्राधिकारपत्र असल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वेळी मतदान कक्षात प्रवेश करता येणार नाही. वरच्या दर्जाच्या कोणत्याही व्यक्तींना (उदा. मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, संसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य) यांनाही यातून सूट देण्यात आलेली नाही. 

- निवडणूक पार पाडण्याच्या संबंधातील कोणतीही तक्रार किंवा समस्या, निवडणूक निर्णय अधिकारी/ क्षेत्र/ प्रभाग दंडाधिकारी यांच्या किंवा राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी.

- राज्य निवडणूक आयोग,   महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे निवडणुकीच्या विविध पैलूंच्या संबंधातील  सर्व बाबींविषयीच्या आदेशांचे   पालन करण्यात यावे. 

२) आचारसंहितेत "काय करू नये"

- शासकीय वाहने किंवा कर्मचारी वर्ग किंवा यंत्रणा यांचा निवडणूक प्रचारविषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये. 

- सत्तेमध्ये असलेला पक्ष किंवा शासन यांनी साध्य केलेल्या उद्दिष्टांबाबत सरकारी कोषागाराच्या खर्चाने कोणतीही जाहिरात देऊ नये.

- कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषण करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते बांधण्याचे वचन देणे आदी गोष्टी करू नयेत.

- शासन किंवा सार्वजनिक उपक्रमांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ (Adhos)नियुक्त्या करू नयेत. 

- मंत्र्यांना (राज्यमंत्री व उपमंत्र्यांसहित)  उमेदवार असल्याखेरीज किंवा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याखेरीज किंवा मतदानासाठी मतदार या नात्याने असेल त्याखेरीज मतदान कक्षामध्ये किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करता येणार नाही. 

- निवडणूक मोहिम/प्रचार यांच्या जोडीने कोणतेही सरकारी काम पार पाडण्यास येऊ नये.

- मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारचे प्रलोभन देता येणार नाही.

- मतदारांच्या जातीय व धार्मिक भावनांना आवाहन करण्यात येऊ नये.

- विभिन्न जाती, जमाती यांच्यातील किंवा धार्मिक किंवा भाषिक गटातील मतभेद, ज्यामुळे अधिक तीव्र होतील किंवा परस्परातील वैमनस्य वाढेल किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये. 

- इतर पक्षांचे कोणतेही नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नसेल अशा त्यांच्या खासगी जीवनातील कोणत्याही पैलूंवर टीका करता येणार नाही. 

- ज्यांचा खरे-खोटेपणा पडताळून पाहिलेला नाही, असे आरोप ठेवून किंवा त्यास विकृत स्वरूप देऊन इतर पक्ष किंवा त्या पक्षाचे कार्यकर्ते यांच्यावर टीका करण्यात येऊ नये.

- निवडणूक प्रचार तसेच भाषणे, निवडणूक प्रचाराचे फलक, संगीत आदींसाठी कोणत्याही प्रार्थनास्थळाचा वापर करण्यात येऊ नये. 

- लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, खोट्या नावाने मतदान करणे, मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविणे व तेथून परत नेणे आदी भ्रष्ट गोष्टी करता येणार नाहीत‌. 

- व्यक्तींची मते किंवा कृत्ये याविरुद्ध निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने करता येणार नाहीत किंवा धरणे धरता येणार नाहीत.

- कोणत्याही व्यक्तीला अन्य व्यक्तीची जमीन, इमारत आदींचा वापर त्यांच्या मालकांच्या परवानगीखेरीज करणे,दंड उभारणे, कापडी फलक लावणे, नोटीशी चिकटविणे किंवा घोषणा लिहिणे आदी बाबी करता येणार नाहीत. यामध्ये शासकीय, सार्वजनिक व  खासगी जागांचा समावेश असेल. 

- इतर राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या सार्वजनिक सभा व मिरवणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा  निर्माण करण्यात येऊ नये.

- एका पक्षाची जेथे सभा चालू आहे, अशा जागी दुसऱ्या पक्षाद्वारे मिरवणूक काढण्यात येऊ नये. 

- दुसऱ्या पक्षांनी किंवा उमेदवारांनी लावलेली प्रचारपत्रके, भितीपत्रके काढून टाकण्यात येऊ नयेत. मात्र याबाबत काही आक्षेप असल्यास पोलिसांच्या किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून द्यावे. 

-  मतदानाच्या दिवशी ओळखपत्र चिठ्ठ्या वितरीत करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षामध्ये प्रसारपत्रके, पक्षांचे ध्वज, पक्ष चिन्ह किंवा इतर निवडणूक प्रचार साहित्यांचे  प्रदर्शन करू नये.

- ध्वनिक्षेपकांचा मग ते एकाच जागी लावलेले असोत किंवा फिरत्या वाहनांवर बसविलेले असोत, सकाळी ६ वाजण्यापुर्वी किंवा रात्री १० वाजल्यानंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी घेतलेली असल्याखेरीज वापर करु नये. तसेच याबाबत असलेल्या The Nolar Pollution (Regulation and Control) Rules, 2000 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. 

- तसेच संबंधित प्राधिकाऱ्यांची लेखी पूर्वपरवानगी असल्याखेरीज सार्वजनिक सभेच्या जागी किंवा मिरवणुकीत किंवा प्रभारीत ध्वनिक्षेपकाचा वापर करु नये. अशा सभा/ प्रचारफेरी या रात्री १०.२० वाजल्यानंतर चालू ठेवण्याची परवानगी  देण्यात येणार नाही. शिवाय याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन आणि त्यांनी घालून दिलेल्या अटींचे पालन करणे बंधनकारक आहे. 

- निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारच्या पैशाचे, मद्याचे, वस्तूंचे वाटप करता येणार नाही.