Retired employees of Pune Zilla Parishad extend a 'helping hand' to farmers : पुणे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतरही जपला 'सेवेचा वसा'
पुरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा 'आधार' : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांचे दिवाळीचे साहित्य वाटप
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २४ ऑक्टोबर २०२५ :- केंद्र किंवा राज्य सरकारच्या प्रशासनात कार्यरत असलेला कोणताही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी म्हटलं की, कर्तव्य म्हणून का समाजासाठी सेवा बजावत असतो.अर्थात यासाठी त्यांना मोबदला मिळत असतो.परंतू, एकदा का सरकारी सेवा संपली की त्यांच्यातील सेवेचा भाग संपून जातो, हा इतिहास आहे. पण याला पुणे जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कर्मचारी अपवाद ठरले आहेत. या सर्वांनी सेवानिवृत्तीनंतरही आपलं समाजाशी काही देणंघेणं आहे, या भावनेतून गरजवंतांना मदतीचा हात देण्याचे काम चालूच ठेवले आहे. यानुसार या सर्वांनी मिळून मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दीड लाख रुपयांचा निधी जमा केला आणि या निधीतून बीड जिल्ह्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीसाठीचे साहित्य वाटप केले आहे. या कृतीतून जिल्हा परिषदेच्या या कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर 'सेवेचा वसा' जपला आहे.
यंदाच्या दिवाळीपुर्वी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठी अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची शेती, शेतीतील पिके, गुरे-ढोरे आणि संसारोपयोगी साहित्य वाहून गेले. यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावरच येथील शेतकरी कुटुंबे अक्षरक्षा उघड्यावर पडली आहेत. या बाधित शेतकऱ्यांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आपण फूल ना, फुलाची पाकळी म्हणून काही तरी मदत करावी, या हेतूने प्रेरित होऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दीड लाख रुपयांचा निधी जमा केला. यासाठी पुणे जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकारिणीने पुढाकार घेतला आणि सर्व सभासदांच्या मदतीने मदत निधी उभारण्याचा संकल्प केला आणि त्यातूनच हा दीड लाख रुपयांचा निधी संकलित झाला.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांना दिवाळ सणाचे साहित्य किट वाटप करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार हे कर्मचारी बीड जिल्ह्यातील केळ (ता. आष्टी) येथे पोहोचले व या गावातील सुमारे २०० कुटुंबांना दिवाळीसाठीच्या साहित्याच्या किटचे वाटप केले. या अनपेक्षित मदतीमुळे गरजू शेतकरी कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आल्याचे सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे अध्यक्ष पंडित मर्ढेकर यांनी सांगितले. या गावातील बाधित शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी केळ गावचे सरपंच सचिन दळवी यांनी सहकार्य केले.
यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष विनायक बहिरट, सचिव जीवन गायकवाड, खजिनदार सुभाष झणझणे, सहसचिव विष्णुपंत पवार, कार्यकारणी सदस्य, तुळशीराम गायकवाड, आत्माराम सैदाणे, गोविंद डोळे, सुमंत जगताप, दशरथ घुले आदी पदाधिकारी व सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.
