I want to be President of India :  "मलाही तुमच्यासारखे भारताचा राष्ट्रपती व्हायचंय"!

पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याने चक्क खुद्द राष्ट्रपतींनाच बोलून दाखवली मनातील इच्छा : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मूंनी साधला झेडपी शाळेच्या विद्यार्थ्यांसमवेत संवाद 

I want to be President of India :  "मलाही तुमच्यासारखे भारताचा राष्ट्रपती व्हायचंय"!
पुणे:- जिल्हा परिषदेच्या शाळेतील सोहम पराठे या १२ वर्षीय विद्यार्थ्यांसोबत राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १५  नोव्हेंबर २०२५ :- बाळा, सांग बरं, तुला पुढे काय व्हायचे आहे, असा प्रश्न भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू देशभरातून राष्ट्रपती भवनात आलेल्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषेतून विचारात होत्या.निमित्त होते राष्ट्रीय बालदिनाचे. या बालदिनानिमित्त आयोजित संवाद कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांना कोणी डॉक्टर, कोणी सैनिक, कोणी पायलट तर, कोणी पोलिस अधिकारी व्हायचे असल्याचे सांगितले. पण या प्रश्नाला पुणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका १२ वर्षीय विद्यार्थ्याने, 'मला भारताचा राष्ट्रपती व्हायचंय', असे. उत्तर दिले. या उत्तराने क्षणभर राष्ट्रपतीही चकीत झाल्या आणि त्यांनी लगेच त्या विद्यार्थ्यांला आपुलकीने जवळ घेत, पाठीवर शाबासकीची थाप मारत भविष्यात राष्ट्रपती होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

भविष्यात "तू नक्कीच भारताचा  राष्ट्रपती होशील, पण तेव्हा तुझ्यासोबत मला फोटो काढण्याची संधी मिळेल की नाही, याची शाश्वती नाही. त्यामुळे आजच मी तुझ्यासोबत फोटो काढते" असं म्हणत राष्ट्रपती मुर्मू यांनी त्या विद्यार्थ्याला आपुलकीने जवळ घेत, त्यांच्यासोबत फोटोही काढला. हा प्रसंग राष्ट्रीय बालदिनी (दि.१४ नोव्हेंबर) राष्ट्रपती भवनात घडला. चक्क भारताच्या राष्ट्रपतींनाच मला राष्ट्रपती व्हायचंय, अशी मनातील इच्छा सांगणाऱ्या या विद्यार्थ्यांचे नाव सोहम मारुती पारठे असे आहे. सोहम पारठे हा पुणे जिल्हा परिषदेच्या आपटी (ता.भोर) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी आहे.  

राष्ट्रीय बालदिनाचे औचित्य साधून पुणे जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमधील ५० विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे शैक्षणिक अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. या अभ्यास दौऱ्यात राष्ट्रपती भवन पाहण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळाली. बालदिनानिमित्त राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला. जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवन, संसद आणि संसदीय लोकशाही प्रणालीची ओळख व्हावी, या उद्देशाने ५० गुणवंत विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथे शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी पाठविण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या "पुणे मॉडेल स्कूल" या प्रकल्पांतर्गत हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. 

या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनासह  संसद, नेहरू तारांगण, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, जंतर मंतर, आणि लाल किल्ला या वैज्ञानिक व सांस्कृतिक स्थळांना भेट देण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. "आयुका"तर्फे घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेतून हे विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. हा अभ्यास दौरा विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय लोकशाही व भारतीय संस्कृती याबद्दल हजाराची भावना दृढ करणारा ठरेल, हा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, देशाच्या राष्ट्रपतींना भेटून जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी भारावून गेले. यापैकी काही विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून राष्ट्रपतींनी त्यांच्या भविष्यातील वाटचालीबाबत, शिक्षण व अन्य आवडीनिवडीबाबत अतिशय आपुलकीने संवाद साधला. 

"पुणे मॉडेल स्कूल" हा पुणे जिल्हा परिषदेचा  महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना नासा येथे, तर अन्य ५० विद्यार्थ्यांना ईस्त्रो येथे अभ्यासदौऱ्यास पाठविण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, हाच यामागचा हेतू आहे. तसेच विद्यार्थ्यांना भारताची संसदीय लोकशाही प्रणाली अवगत व्हावी, या उद्देशाने ५० विद्यार्थ्यांना दिल्ली येथे राष्ट्रपती भवन, संसद व इतर महत्त्वाच्या संस्थांच्या भेटीसाठी पाठवण्यात आले आहे. केवळ पुस्तकातून माहिती न मिळवता प्रत्यक्ष अनुभवातून या विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल निर्माण व्हावे. या कुतूहलातून प्रश्न निर्माण व्हावेत, व या प्रश्नांच्या उत्तरातून विद्यार्थ्यांना ज्ञान मिळावे, हा यामागचा उद्देश आहे. या सर्व उपक्रमांना मिळणारा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आम्हाला ऊर्जा देणारा आहे.

- गजानन पाटील, 
- मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद