Pune Zilla Parishad launches Spandan portal for the disabled : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील दिव्यांगांना 'स्पंदन'ची भेट! 

पुणे जिल्हा परिषदेतर्फे खास संकेतस्थळ विकसित : दिव्यांगांना आता घरबसल्या मिळणार माहिती

Pune Zilla Parishad launches Spandan portal for the disabled : जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील दिव्यांगांना 'स्पंदन'ची भेट! 
पुणे:- जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी विकसित करण्यात आलेल्या स्पंदन पोर्टलचा शुभारंभ करताना प्रतापराव पवार. यावेळी महेश पाटील, गजानन पाटील आदी.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ४ डिसेंबर २०२५ :- जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील दिव्यांगांना 'स्पंदन'ची अनोखी भेट दिली आहे. या 'स्पंदन'मुळे पुणे जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना आता घरबसल्या सरकारी योजना व त्यांच्याविषयी आवश्यक साधनांची सविस्तर माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे दिव्यांगांना त्यांचे लाभ मिळण्यासाठी पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत आणि त्यांची फरफटही थांबणार आहे. 

पुणे जिल्हा परिषदेचा सामाजिक न्याय विभाग आणि बालकल्याण संस्थेच्यावतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात 'स्पंदन' या पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बाल कल्याण संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, राज्याचे  दिव्यांग कल्याण आयुक्त महेश पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,अभिनेत्री स्मिता शेवाळे, नॅशनल पॅरा योगाच्या कन्व्हेनर डॉ. सुनंदा राठी, प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे आणि जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी राधाकिसन देवढे आदी उपस्थित होते. 

'स्पंदन' हे नवीन पोर्टल पुणे जिल्हा परिषदेच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सुरू करण्यात आले आहे. हे ग्रामीण भागातील दिव्यांग विद्यार्थी व मुलांसाठी तयार केले आहे. या पोर्टलमध्ये ७० प्रश्नांची एक प्रश्नावली केलेली आहे. या प्रश्नावलीत दिव्यांगांच्या २१ प्रकारानुसार दिव्यांग व्यक्तींना आवश्यक असलेली सर्व साधने (इक्विपमेंटस), डिव्हायसेस यांची उपलब्धता कशी करावी,दिव्यांग प्रकारानुसार विविध सरकारी  योजनांचा लाभ कसा घेता येऊ शकतो, याचीही माहिती उपलब्ध होणार आहे. भविष्यात या सगळ्याचा उपयोग दिव्यांग क्षेत्राला जास्त सक्षम बनवण्याच्या दृष्टीने होणार आहे. प्रवर्गनिहाय जिल्ह्यात कोणत्या प्रवर्गाचे किती व्यक्ती आहेत, याची सविस्तर माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.

या पोर्टलला 'स्पंदन'  दिव्यांग ऑनलाईन नोंदणी पोर्टल असे नाव देण्यात आले असून ते जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने विकसित केले आहे. हे पोर्टल प्रामुख्याने दिव्यांग व्यक्तींसाठी (Persons with Disabilities - PwD) अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण पुणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची ऑनलाईन नोंदणी करणे आणि त्यांना विविध सरकारी योजना व सुविधांचा लाभ मिळवून देणे आहे, हा या पोर्टलचा प्रमुख उद्देश आहे. 

'स्पंदन' पोर्टलवर उपलब्ध होणाऱ्या सुविधा 

 - पुणे जिल्ह्यातील दिव्यांग ऑनलाईन नोंदणी. 

- नवीन दिव्यांग नोंदणी.

- लॉग इन सुविधा.

- नोंदणी रिपोर्ट. 

- दिव्यांगांसाठीच्या सरकारी योजनांची माहिती. 

- दिव्यांगासाठीचे विविध शासन निर्णय उपलब्ध. 

- दिव्यांग शाळांची माहिती.

- नोकरीविषयक माहिती.

- दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम 2016 (PwD Act 2016) ची माहिती.

कोठे भेट द्याल? 

पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांनी www.zppunespandan.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

पुणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी हे पोर्टल अत्यंत उपयुक्त आहे. कारण या माध्यमातून ते शासकीय योजनांसाठी नोंदणी करू शकतात आणि संबंधित माहिती मिळवू शकतात.

- गजानन पाटील, 
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,पुणे.