Ncp Sharadchanchandra Pawar Parti State President Jayant Patil Resignation :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राजीनामा!
प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड : येत्या मंगळवारी शिंदे पदभार स्विकारणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १२ जुलै २०२५ :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी (दि.१२ जुलै) रोजी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकारला असून, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. शिंदे हे येत्या मंगळवारी (दि. १५ जुलै) रोजी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारणार आहेत.
यामुळे जिल्हा परिषद व महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भाकरी फिरवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन कार्यक्रमात जयंत पाटील पदमुक्त करण्याची विनंती केली होती.त्यांची ही विनंती या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंजूर केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षात खांदेपालट झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. शशिकांत शिंदे हे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कार्यरत आहेत. त्यांनी या विधानसभा मतदारसंघाचे सलग चार वेळा प्रतिनिधित्व केले आहे. सन १९९९ ते २०१९ या कालावधीत ते या मतदारसंघाचे आमदार होते. दरम्यान, सन २०१३-१४ या कालावधीत त्यांनी राज्य मंत्रिमंडळातही काम केले आहे. माथाडी कामगारांचे नेते अशीही त्यांची ओळख आहे. सन २०२४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीत त्यांचा उदयनराजे भोसले यांनी पराभव केला होता.
