Exhibition of Diwali items made by special students of Pune Municipal Corporation school : चला, जगण्याचा संघर्ष करणाऱ्या महापालिकेच्या शाळेतील विशेष विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊ यात!
विशेष मुलांनी बनविलेली पणती घरात आणून त्यांचे जीवन उज्ज्वल करण्यास प्रोत्साहन द्या : या मुलांच्या दिवाळी वस्तूंचे महापालिकेत प्रदर्शन व विक्री
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १६ ऑक्टोबर २०२५ :- पुणे शहरातील एकमेव असलेली महानगरपालिकेची विशेष शाळा आपण जाणून आहातच.शहरातील अन्य सर्व शाळांच्या तुलनेत ही शाळा आणि विद्यार्थीही खूप वेगळे आहेत. अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे या शाळेतील विद्यार्थी दहावी, बारावीची परीक्षा देऊन नोकरीसाठी धडपडत नाहीत तर, यांचा संघर्ष हा स्वत:चे जीवन जगण्याचा असतो. कारण या शाळेतील विद्यार्थी हे अन्य सर्व शाळांच्या तुलनेत खुपचं भिन्न आहेत. शालेय जीवनापासून विविध कौशल्ये आत्मसात करून स्वयंरोजगाराचा मार्ग निवडत असतात. याच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या वस्तूंची निर्मिती केली आहे.
या वस्तूंचे दोन दिवसीय प्रदर्शन हे गुरुवारपासून (दि.१६ ऑक्टोबर) पुणे महापालिका मुख्यालयाच्या आवारात भरविण्यात आले आहे. आपण फक्त या विशेष मुलांनी बनविलेली पणती घरात आणून त्यांचे जीवन उज्ज्वल करण्यास प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यामुळे जगण्याचा संघर्ष करणाऱ्या महापालिकेच्या या शाळेतील विशेष विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊ शकणार आहोत. हे प्रदर्शन पुणे महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीत असलेल्या कर संकलन विभागाच्या खिडकी शेजारी भरविण्यात आले आहे. ते दि. १६ व १७ ऑक्टोबर असे दोन दिवस असणार आहे. या दोन्ही सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत या प्रदर्शनाला भेट देता येणार आहे.
पुणे महापालिकेची विशेष मुलांसाठीची ही एकमेव शाळा आहे. पुणे शहरातील शिवाजीनगर गावठाण येथे ही शाळा आहे. सन २००९ पासून सुरु असलेल्या या शाळेत पुणे शहराच्या विविध भागातून व सामान्य कुटुंबातून आलेले विशेष विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.यामध्ये ऑटीस्टिक, सेरेबलपाल्सी, बौद्धिक अक्षम, अतिचंचल, स्लोलर्नर, डाऊन सिंड्रोम आणि अध्ययन अक्षम अशा विविध प्रकारातील विशेष विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सध्या या शाळेत ५५ विशेष विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
या शाळेमध्ये विशेष विद्यार्थ्यांना त्यांच्या बुध्यांकानुसार, आवडीनुसार, कलेनुसार, मुडनूसार विशेष शिक्षण दिले जाते. या सर्व विशेष विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनवून त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करण्याइतपत सक्षम बनविणे, हा या शाळेचा मुख्य उद्देश आहे. उद्देश पुर्ण करण्यासाठी या शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व अन्य कर्मचारी हे सामुदायिक प्रयत्न (टीम वर्क) करत असतात.
या शाळेतील विशेष विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सहा कौशल्यावर आधारित शिक्षण देण्यात येते. यामध्ये स्वावलंबन कौशल्य, बौद्धिक कौशल्य, कारक कौशल्य, सामाजिक कौशल्य, मनोरंजनात्मक कौशल्य आणि व्यावसायपूर्व कौशल्य आदींचा समावेश असल्याचे या शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा काळे यांनी सांगितले.
स्वावलंबन कौशल्यामध्ये स्वतःचे दात स्वतः कसे घासावेत (ब्रशिंग), स्वतः आंघोळ कशी करावी (बाथिंग), जेवण, स्वतःची कामे आवरणे, कपडे घालणे, आपल्या आवश्यक गरजा इतरांना सांगता येणे, बौद्धिक कौशल्यामध्ये भाषा, अंकगणित, सामान्य ज्ञान, कारक कौशल्यामध्ये हात व बोटे यांची क्रिया, हातांची-बोटांची पकड, हस्तनेत्र कौशल्य विकास, सामाजिक कौशल्यामध्ये शाळेतील व घरातील सर्व परिसर, व्यक्ती यांची ओळख, सार्वजनिक ठिकाणांची ओळख उदा. मंदिर, बाजार, बस स्थानक, शाळेत विविध सण दिवस साजरे करणे, मनोरंजनात्मक कौशल्यामध्ये विविध बालगीते, नृत्य, संगीत, चित्रकला, हस्तकला शिकविणे,खेळ व बागकाम करणे आणि व्यवसायपूर्व कौशल्यांमध्ये विद्यार्थी एखादा व्यवसाय शिकून आपल्या पायावर उभा रहावा, याविषयीचे प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे वर्षा काळे यांनी सांगितले.
या शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त या सणासाठी आवश्यक असलेल्या पणत्या, पॉट रंगविणे, कागदी पिशव्या बनविणे, आकाशकंदील फुलांचे तोरण, मेणबत्त्या तयार केल्या आहेत. या विशेष विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो यानुसार यंदाचा हा उपक्रम म्हणजे या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचा स्टॉल शाळेमध्ये व पुणे महापालिकेच्या मुख्यालयात लावण्यात आला आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यवसायपूर्व कौशल्य विकसित व्हावेत व त्यांना व्यवहार ज्ञान मिळावे आणि त्यांचा सामाजिक कौशल्य विकास व्हावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा काळे, सहशिक्षक निलेश मिरगणे, प्रियांका मोरे आणि शाळेतील सेवकवर्ग हा संयुक्तपणे काम करत आहे.
दिव्यांगता म्हणजे अक्षमता नसते. उलट या विशेष विद्यार्थ्यांमध्ये एक सुप्त क्षमता लपलेली असते. म्हणूनच या विद्यार्थ्यांमध्ये काय कमी आहे, याचा विचार न करता यांच्यात काय गुण आहे, असा सकारात्मक विचार करून त्यांच्यातील कला गुणांना वाव देण्यासाठी शाळेमध्ये विविध कला व क्रिडा स्पर्धा, विविध क्षेत्रभेटी, वार्षिक स्नेहसंमेलन, जागतिक दिव्यांग दिन, विविध सण व समारंभ, पालकांसाठी विविध उपक्रम, वृक्षदिंडी, विशेष विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री उपक्रम आदी विविध उपक्रम वर्षभर आयोजित केले जातात.
- वर्षा काळे,
मुख्याध्यापिका, महापालिका विशेष शाळा, शिवाजीनगर गावठाण, पुणे.
