वसंतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे भव्य एक किलोमीटर लांबीची तिरंगा रॅली

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभक्तीचा उत्साह जागृत : अध्यक्ष जालिंदर कामठे यांचा पुढाकार 

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे भव्य एक किलोमीटर लांबीची तिरंगा रॅली
पुणे:- वसंतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे काढण्यात आलेली तिरंगा रॅली.

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १६ ऑगस्ट २०२५ :-  भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पुण्यातील वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांच्या नेतृत्वाखाली एक किलोमीटर लांबीची ही भव्य तिरंगा रॅली स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला काढण्यात आली. या रॅलीत शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात तिरंगा आणि देशभक्तीपर घोषणा देत संपूर्ण कोंढवा बुद्रुक परिसरात या तिरंगा रॅलीने परिसर दुमदुमला.

वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅलीत प्रतिष्ठान व भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष जालींदर कामठे यांच्यासह कोंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, शिवाजीराव मरळ, गणेश कामठे, सुखदेव लोणकर, रोहन कामठे,अमित कामठे, प्राचार्य भानुदास रिठे आदींसह शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

यावेळी देशभक्तीपर गीते, फटाके, विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक सादरीकरण करण्यात आले.  विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यविरांच्या वेशभूषा करत या रॅलीत सहभाग घेतला. या रॅलीमुळे संपूर्ण कोंढवा परिसरात नागरिकांच्या मनात देशभक्तीचा उत्साह जागृत करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यविरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी नागरिकांना राष्ट्रध्वजाचा मान राखण्याचे व राष्ट्रीय ऐक्य व एकात्मतेचा संदेश देण्याचे आवाहन जालींदर कामठे यांनी केले.