गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीवर कायम आर्थिक मदतीची शाबासकी देणारे रवींद्र भोसले यांच्या पाठीवर कौतुकाची थाप
पुणे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष भोसले यांच्या सामाजिक कार्याची दखल : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते खास सन्मान
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २१ जुलै २०२५ :-आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कोणताही विद्यार्थी केवळ पैशांअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने कायम गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून जाणारे पुण्यातील एक नाव म्हणजे रवींद्र भोसले होय. कोणी विद्यार्थी पैशांअभावी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, कोणी विद्यार्थी केवळ राहण्या-खाण्याच्या सोयी अभाव शिक्षण अर्धवट सोडणार नाही. एवढेच नव्हे तर, केवळ शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास पैसे नसल्याने शाळा सोडण्याची वेळ येऊ नये, याची खबरदारी घेत, स्वतःच्या खिशातून संबंधित विद्यार्थ्याला आर्थिक मदत करण्यात रवींद्र भोसले नेहमीच अग्रेसर असतात. यातूनच ते कधी कोणाचे शुल्क भरतात, कधी कोणाची निवासाची तर, कधी भोजनाची व्यवस्था करतात आणि शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा एखादा खेळाडूही पैशांअभावी संबंधित खेळापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतात. यातूनच त्यांनी आतापर्यंत अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठी आर्थिक मदत केली आहे. विद्यार्थ्यांबरोबरच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब, घरातील कर्ता पुरुष गेल्याने पोरंक झालेले कुटुंब आणि नैसर्गिक आपत्तीमुळे आकस्मिक मृत्यू झालेल्या कर्त्या पुरुषाच्या कुटुंबाला त्यांनी आर्थिक मदतीचा आधार दिला आहे. विशेष म्हणजे याबाबतची कसलीही प्रसिद्धी केलेली नाही. त्यांच्या या कार्याची पार्टी ट्रस्ट या संघटनेने दखल घेतली आणि प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते त्यांचा खास सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे भोसले यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली आहे.
पार्टी ट्रस्टच्या वतीने सोशल मीडियावरील सर्वपक्षीय मित्रांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. या स्नेहमेळाव्यात समाजातील विविध घटकांना आर्थिक मदत करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. या स्नेहमेळाव्याला राज्यभरातील सुमारे पाच हजार प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये दरवर्षी या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव केला जातो. दरम्यान, या मेळाव्यात शेतकरी मदतनिधी आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आले. आपली माणसं मोठी झाली पाहिजेत, या संकल्पनेवर आधारित या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
या मेळाव्याला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अॅंड ब्लॅक चैन एक्स्पर्ट गौरव सोमवंशी, गायक, संगितकार विजय चंद्रसेन भटे, लावणी सम्राट किरण कोरे, गावाकडच्या गोष्टी फेम नितीन पवार आदी उपस्थित होते. दरम्यान, रवींद्र भोसले हे सध्या पुणे कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष आहेत. गेल्या सुमारे दोन दशकांपासून ते राज्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करत आहेत.
