शिनोलीत येत्या गुरुवारी निराधार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, झेडपीच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम!

या उपक्रमाचे सलग आठवे वर्ष :  स्वतःच्या पगारातून यंदा ९६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार 

शिनोलीत येत्या गुरुवारी निराधार व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, झेडपीच्या शिक्षकांचा अनोखा उपक्रम!
पुणे:- मोफत शालेय साहित्य वाटपाबाबत ए. आय. ने तयार केलेले छायाचित्र

ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. ८ जुलै २०२५ :-  जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या आंबेगाव तालुक्यातील ९६ विद्यार्थ्यांना यंदा शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी येत्या गुरुवारी (दि.१० जुलै) आंबेगाव तालुक्यातील शिनोलीतील शेठ पिरोजशहा गोदरेज सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार येवले व सचिव मचिंद्र झांजरे यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षण अधिकारी (प्राथमिक ) संजय नाईकडे यांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाणार आहे. येथील शारदा प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग येवले महाराज हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील.आंबेगाव तालुक्यायातील अनाथ, निराधार,गरजू मुलांना दत्तक घेऊन शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा अनोखा उपक्रम हा पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांनी सुरू केला आहे. यासाठी हे सर्व शिक्षक स्वतःच्या पगारातून शैक्षणिक साहित्य खरेदी करत आहेत. सन २०१७ -२०१८ पासून गेली आठ वर्षे अखंडपणे हा उपक्रम सुरू आहे.

पुणे जिल्हा शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष दत्तात्रेय वाळुंज यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाची सुरवात झाली. सुरुवातीला वाळुंज यांच्यासह नंदकुमार येवले, सुरेंद्र डोके, किसन कोंढवळे या चार शिक्षकांनी  हा उपक्रम सुरू केला.मात्र गरजू विद्यार्थ्यांची वाढती  संख्या लक्षात घेऊन, त्यांनी यासाठी यावर्षी भीमाशंकर गुरुकुल प्रतिष्ठानची स्थापना केली आहे.

या उपक्रमात नारायण काळे, सुनिल पाटील,  सुनिल बुरसे, किसन शिंगाडे, ईश्वर फदाले,  प्रदीप चासकर, आनंद संत आदी शिक्षक सहभागी आहेत. या कार्यक्रमात नवनियुक्त गटशिक्षणाधिकारी, पदोन्नती मिळालेले विस्तार अधिकारी, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
  
या उपक्रमामुळे आम्हाला शिक्षणासाठी मोठी मदत झाली आहे. आमची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असून, आम्हाला गेली सहा वर्षांपासून शैक्षणिक साहित्य मिळत आहे.

  - प्रतिक बबन गभाले,
विद्यार्थी, फुलवडे, ता. आंबेगाव