Finally Zilla Parishad election voter list published : ... अखेर जिल्हा परिषद निवडणुकीच्या गटनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध! 

झेडपी निवडणुकीच्या अंतिम मतदार याद्यांची प्रतिक्षा संपली : राज्यातील झेडपी निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज 

Finally Zilla Parishad election voter list published : ... अखेर जिल्हा परिषद निवडणुकीच्या गटनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध! 
पुणे :- जिल्हा परिषद निवडणूक मतदार याद्या प्रसिद्ध

डॉ. गजेंद्र बडे ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. २७ नोव्हेंबर २०२५ :- ... अखेर तब्बल महिनाभराच्या प्रतिक्षेनंतर गुरुवारी (दि.२७ नोव्हेंबर)  महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच्या अंतिम व गटनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.यामुळे या याद्यांबाबतची गेल्या महिनाभरापासून असलेली प्रतिक्षा संपली आहे. यामुळे राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज होऊन बसला आहे. 

राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या जिल्हा परिषद गटनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी याआधी सलग तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढींमुळे या मतदार याद्यांच्या प्रसिद्धीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता‌. हा संभ्रम आता दूर झाला आहे. शिवाय राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार गेल्या महिन्याच्या म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातील २७ तारखेलाच या याद्या प्रसिद्ध होणार होत्या. परंतू,या तारखेला या मतदार याद्या प्रसिद्ध न करता, त्यांना पहिल्यांदा १२ नोव्हेंबरपर्यंत, दुसऱ्यांदा २४ नोव्हेंबरपर्यंत तर, तिसऱ्यांदा २७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून या मतदार याद्यांची प्रतिक्षा कायम होती. मात्र आता ही प्रतिक्षा कायमस्वरूपी संपली आहे. 

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच्या अनुक्रमे गट आणि गणनिहाय अंतिम मतदार याद्या या सर्वांना पाहण्यासाठी दि‌.३ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. राज्यातील २६ जिल्हा परिषदा आणि २८६ पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल अनुक्रमे दि. २० मार्च आणि दि‌‌. १३ मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे.

तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. त्यानंतर पुन्हा आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे. याही सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे.