Zilla Parishad election voter list : राज्यातील जिल्हा परिषदांच्या गटनिहाय मतदार याद्या प्रसिद्धीस सलग तिसऱ्यांदा मुदतवाढ! 

राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय : आता येत्या २७ नोव्हेंबरला गटनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध होणार 

Zilla Parishad election voter list : राज्यातील जिल्हा परिषदांच्या गटनिहाय मतदार याद्या प्रसिद्धीस सलग तिसऱ्यांदा मुदतवाढ! 
पुणे:- जिल्हा परिषद निवडणूक गटनिहाय मतदार याद्या प्रसिद्धीस पुन्हा मुदतवाढ.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. २५ नोव्हेंबर २०२५ :- महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गटनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यास राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि.२४ नोव्हेंबर) तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे.नियोजित कार्यक्रमानुसार सोमवारी या मतदार याद्या प्रसिद्ध होऊ शकल्या नाहीत.या याद्या आता येत्या २७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे या याद्यांना आणखी तीन दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतराज संस्थांमधील राखीव जागांच्या वाढीव आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या आव्हान याचिकांवरील सुनावणी मंगळवारी ही (दि.२५ नोव्हेंबर) पूर्ण होऊ शकली नाही. ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आत ती, येत्या शुक्रवारी (दि.२८ नोव्हेंबर) होणार आहे. या सुनावणीनंतरच महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकणार आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठीच्या अनुक्रमे गट आणि गणनिहाय अंतिम मतदार याद्या या सर्वांना पाहण्यासाठी दि‌.३ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. या मतदारयाद्या आपापल्या तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

राज्य निवडणूक आयोगाने याआधी पहिल्यांदा या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आली होती.या मुदतवाढीच्या कार्यक्रमानुसार दि.१२ नोव्हेंबर रोजी गटनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या. त्यानंतर पुन्हा एकदा बारा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीनंतर दि.२४ नोव्हेंबर रोजी या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या. मात्र या तारखेलाही या मतदार याद्या प्रसिद्ध न करता यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.ही सलग तिसरी मुदतवाढ आहे. 

महाराष्ट्रातील २६ जिल्हा परिषदा आणि २८६ पंचायत समित्यांच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल अनुक्रमे दि. २० मार्च आणि दि‌‌. १३ मार्च २०२२ रोजीच संपलेला आहे. तेव्हापासून आजतागायत या सर्व पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. त्यानंतर पुन्हा आणखी सहा जिल्हा परिषदा आणि ५० पंचायत समित्यांचा कार्यकाल संपुष्टात आलेला आहे.