वैधव्याच्या दुःखाला सामोरे जाताना आई कधीच खचली नाही, उलट ती पदर खोचून नियतीविरुद्ध उभी राहिली
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी जागवल्या बालपणीच्या आठवणी, हमाल पंचायत कष्टाची भाकर येथे कार्यक्रम संपन्न
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे दि. २४ मार्च २०२५ :- माझा जन्म झाल्यानंतर पाच ते सहा महिन्यातच वडील वारले. त्यामुळे आईला वैधव्याच्या दुःखाला सामोर जावं लागलं. पण ती खचली नाही. उलट ती पदर खोचून नियतीविरुद्ध उभी राहिली. तीने आम्हा मुलांची आई व वडील अशा दोघांची भूमिका उत्कृष्टपणे निभावली आणि सर्व भावंडांना आयुष्यात उभं केलं. हे सर्व करताना कितीही संकट आली तरी, तुम्ही नेकीनं जगलं पाहिजे, असा तिचा कायम आग्रह असायचा. आज जर आम्ही भावंड काही करू शकलो असू, तर त्यामागे नेकीनं जगा ही आईची शिकवण कारणीभूत असल्याचे सांगत ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी सोमवारी (दि.२४ मार्च) त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा दिला.
निमित्त होते, त्यांच्या आई बबुताई आढाव यांच्या ३१ व्या स्मृती दिनानिमित्त हमाल पंचायत कष्टाची भाकर येथे आयोजित कार्यक्रमाचे. यावेळी डॉ. डॉ बाबा आढाव त्यांच्या आईविषयीच्या अनेक आठवणी सांगितल्या. ते पुढे म्हणाले, "आई सांगायची सौभाग्यापेक्षा एकटेपण सांभाळणे कठीण असतं. नवरा जिवंत असलेल्या बाईपेक्षा विधवा झालेल्या बाईकडे समाजाचे जास्त लक्ष असते. माझ्या आईच्या कपाळी कुंकू कायम होतं. माझ्या कपाळावरचे ते पुसलं गेलं होतं. इतक्या विपरीत काळातही,मी डगमगले नाही. नियतीने घेतलेल्या परीक्षेत मी पास झाले अशी तुम्हा मुलांनी गाजवलेल्या कर्तत्वावरून आता खात्री पटते, असे म्हणायची."
त्याकाळी सेवासदन संस्थेत जाऊन तिने शिवणकला शिकून घेतली. तिचा उपयोग करून विविध प्रकारचे कौशल्यपूर्ण शिवणकाम करत आम्हा मुलांना वाढवलं. उत्कृष्ट शिक्षण दिलं. हमाल पंचायतीने कष्टाची भाकर सुरू केल्यावर कष्टाच्या भाकर उपक्रमामध्ये आपली क्षुधाशांती करायला येणाऱ्या कष्टकरी गरिबांना ताजे स्वच्छ सकस अन्न मिळेल, याकडे तिचा कटाक्ष असायचा. चपातीच्या कडा तपासणे, भाजीची चव बघणे, भात नीट शिजतोय ना? याकडे लक्ष देणे.स्वयंपाक करणाऱ्या हमालांच्याच कुटुंबातील महिलांना त्यांच्या कामाचे महत्व सांगणे. हे तिने वर्षानुवर्षे बारकाईने केले. एखादा उपक्रम सुरू करणे तुलनेने सोपे असते. पण आई बबूताई आढाव यांनी कष्टाची भाकरसारख्या उपक्रमाकडे दीर्घकाळ लक्ष दिल्यामुळे उपक्रमाला एक प्रकारची शिस्त लागली आणि अलीकडेच कष्टाच्या भाकरने पन्नास वर्षे एवढा दीर्घकाळाचा टप्पा पूर्ण केला आहे.
यावेळी बबुताई आढाव यांच्या स्मृतीदिनी कष्टाची भाकर येथे काम करणाऱ्या एका स्त्री आणि एका पुरुष कामगार अनुक्रमे रंजना धोंडीबा दहिभाते आणि भरत लक्ष्मण पारगे या दोन कामगारांना रोख रक्कम, श्रीफळ आणि फुलं देऊन आढाव आणि झेंडे कुटुंबीयांकडून गौरविण्यात आले. झेंडे व आढाव कुटुंबियांकडून या पुरस्कारासाठी ठेवलेल्या ठेवीच्या व्याजातून दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.
यावेळी माजी पोलीस अधिकारी मधुकर झेंडे, नात व निवृत्त शिक्षिका रजनी धनकवडे, श्रीमती शीला बाबा आढाव, नातू व उद्योजक कीरिटी शामकांत मोरे, अंगमेहनती कष्टकरी संघर्ष समितीचे निमंत्रक नितीन पवार, महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठानच्या सरचिटणीस शारदा वाडेकर, बाजार समितीचे कामगार संचालक संतोष नागरे आदी उपस्थित होते. हमाल पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगडे यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष दत्तात्रेय डोंबाळे यांनी आभार मानले.
'कष्टाच्या भाकर' मधील कामगारांना पुरस्काराचा बोनस
कष्टाच्या भाकर येथील कामगारांना दरवर्षी दिवाळीत बोनस दिला जातो. पण आज अनपेक्षित आर्थिक पुरस्कारचा बोनस सर्व स्त्री कामगारांना मिळाला. अलीकडेच बाबा आढाव यांच्या जेष्ठ भगिनी व निवृत्त मुख्याध्यापिका इंदुताई शामकांत मोरे यांचे निधन झाले होते. त्यांच्या स्मृतीनिमित्त त्यांचा मुलगा व बबूताईंचा नातू उद्योजक किरीटी मोरे यांनी पुरस्कार प्राप्त कामगारांसह सर्व स्त्री कामगारांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य केले.
