Pune Zp budget review : पुणे जिल्हा परिषदेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प अवलोकनार्थ सभागृहासमोर ठेवणार!
अध्यक्ष वीरधवल जगदाळे व उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांची घोषणा : जिल्हा परिषद सदस्यांच्या सुचनांनुसार आवश्यक दुरुस्ती करणार
डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. २४ मार्च २०२६ :- पुणे जिल्हा परिषदेच्या आगामी आर्थिक वर्षाचा (सन २०२६-२७) अर्थसंकल्प हा प्रशासकांनी सादर केला आहे. हा अर्थसंकल्प चांगला आहे. पण तांत्रिक कारणांमुळे या अर्थसंकल्पात नवीन झेडपी सदस्यांना आपापल्या सूचना मांडता आलेल्या नाहीत. नवीन सदस्यांना आपापल्या सूचना मांडता याव्यात, या उद्देशाने जिल्हा परिषदेचा हा मूळ अर्थसंकल्प सभागृहासमोर अवलोकनार्थ ठेवण्यात येणार आहे. यावेळी नवीन जिल्हा परिषद सदस्यांच्या सुचनांच्या आधारे या अर्थसंकल्पात दुरुस्त्या केल्या जाणार आहेत.
यासाठी येत्या एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे व उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी सोमवारी (दि.२३ मार्च) संयुक्तपणे बोलताना केली.
या मूळ अर्थसंकल्पात आवश्यक दुरुस्त्या करण्याबाबत विविध सूचना आणि नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा योजना सुचविण्याचे आवाहनही अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केले आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दि. १७ मार्च रोजी पुणे जिल्हा परिषदेचा ३०१ कोटी रुपयांचा जमेचा अर्थसंकल्प सादर केला आहे.
मात्र या तारखेपर्यंत जिल्हा परिषदेच्या नवीन सदस्यांचा कार्यकाळ सुरू झाला नव्हता. त्यामुळे सर्व जिल्हा परिषद सदस्यांना या अर्थसंकल्पात नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा योजना सुचविता आल्या नव्हत्या. त्यामुळे सर्वांना त्या सुचविता याव्यात, या उद्देशाने हा अर्थसंकल्प सभागृहासमोर अवलोकनार्थ सादर करण्यात येत असल्याचे अध्यक्ष जगदाळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रशासक गजानन पाटील यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.), सायन्स पार्कची उभारणी, कौशल्य विकास केंद्र स्थापन करणे, सोलर पार्कची निर्मिती करणे, सामुदायिक अक्षय उर्जा केंद्र उभारणे, मॉडेल स्कूल व मॉडेल आरोग्य केंद्र निर्माण करणे, अनुभव केंद्र व जिल्हा डेटा सेंटरची उभारणी करणे, पिंक रुमची उभारणी करणे, घे भरारी, फिरते शॉपी योजना आणि सावित्री कॅफेची आदींसह विविध ३० नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश केलेला आहे.
पायाभूत सुविधा व लोकाभिमुख योजनांवर भर देणार - वीरधवल जगदाळे
दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी, युवक, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि मागास घटकातील सर्व ग्रामस्थांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आणि लोकाभिमुख योजना व उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. यानुसार मॉडेल स्कूल, मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळांमध्ये कृत्रीम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी इस्त्रो, नासा यांसारख्या आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांमध्ये अभ्यास दौरे आयोजित करणे, शाळा व प्राथमिक आरोग्य केंद्रात सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे, जिल्ह्यातील दळणवळण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रस्ते दुरुस्ती, रस्त्यांचे खडीकरण, डांबरीकरण करणे आदी कामे प्राधान्याने केली जाणार असल्याचे अध्यक्ष जगदाळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
