Pratibha Ingale and Gajanan Patil from Pune division selected in Indian Administrative Service :-पुणे विभागातील प्रतिभा इंगळे आणि गजानन पाटील या अधिकाऱ्यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड!
महाराष्ट्रातील १२ वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना पदोन्नती : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. १५ जुलै २०२५ :- महाराष्ट्रातील महसूल सेवेतील अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्गातील बारा अधिकाऱ्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीमुळे हे अधिकारी आता आय.ए.एस. (I.A.S.) झाले आहेत.यामध्ये पुणे महसूल विभागातील सांगली जिल्हा जातपडताळणी समितीच्या अध्यक्षा असलेल्या प्रतिभा इंगळे आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील या दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (दि.१४ जुलै) विधानसभेत बोलताना ही माहिती दिली. केंद्र सरकारच्या पर्सनल, पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन मंत्रालयाच्या पर्सनल व ट्रेनिंग विभागाने सोमवारी याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती मिळालेल्या या अधिकाऱ्यांना दि. १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीतील रिक्त असलेल्या जागांवर नियुक्त केले जाणार आहे. राज्यातील प्रशासकीय सेवा अधिक लोकाभिमुख व्हावी, यासाठी या सर्व अधिकाऱ्यांना सेवेची नवी महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.
सांगली जिल्हा जातपडताळणी समितीच्या अध्यक्षा असलेल्या प्रतिभा इंगळे या अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधर आहेत. त्यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर (पुर्वाश्रमीचे औरंगाबाद) येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी शाखेची पदवी प्राप्त केली आहे. त्यानंतर राज्य लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे त्यांची उपजिल्हाधिकारी संवर्गात निवड झाली होती. याआधी त्यांनी पुणे शहर अन्नधान्य वितरण अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यांची नुकतीच अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्गात निवड झाली होती.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचीही राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेद्वारे उपजिल्हाधिकारी संवर्गात निवड झाली होती. पाटील यांनी याआधी राजगुरुनगरचे (तत्कालीन खेड) प्रांताधिकारी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उपसचिव आणि पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी म्हणून म्हणून काम केलेले आहे. पाटील यांचा पुणे जिल्ह्यातील चाकण, हिंजवडी आणि खेड येथील ए.ई. झेड. प्रकल्प पूर्ण करण्यात सिंहाचा वाटा आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मॉडेल स्कूल्स आणि आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र (पी.एच.सी.) हा उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या १०० दिवसांच्या कार्यक्रमात राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
पदोन्नती मिळालेले अधिकारी
- विजयसिंह देशमुख
- विजय भाकरे
- त्रिगुण कुलकर्णी
- गजानन पाटील
- महेश पाटील
- पंकज देवरे
- मंजिरी मनोलकर
- आशा पठाण
- राजलक्ष्मी शहा
- सोनाली मुळे
- गजेंद्र बावणे
- प्रतिभा इंगळे
