He lifted the plow on his shoulder and set off on foot for the ministry :- थेट खांद्यावर उचलला नांगर अन् पायी धरली मंत्रालयाची वाट, कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी बनला मंत्रालयाचा 'वारकरी'!

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा १० दिवसांत तब्बल ५०० किलोमीटरचा पायी प्रवास : मंत्रालय मात्र अजून दूरच

He lifted the plow on his shoulder and set off on foot for the ministry :-  थेट खांद्यावर उचलला नांगर अन् पायी धरली मंत्रालयाची वाट, कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी बनला मंत्रालयाचा 'वारकरी'!
पुणे:- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी नांगर घेऊन मंत्रालयाकडे पायी निघालेले शेतकरी सहदेव व्होनाळे.

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. १५ जुलै २०२५ :- थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांनी दि. १८ जुलै १८८३ रोजी शेतकऱ्यांच्या वेदना मांडणारे 'शेतकऱ्यांचा आसूड' हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाला आणखी तीन दिवसांनी तब्बल १४२ वर्ष पूर्ण होतील. परंतु आपण कितीही तंत्रज्ञानाच्या गप्पा मारत असलो तरीसुद्धा अद्यापही शेतकऱ्यांच्या दयनीय अवस्थेत फार सुधारणा झालेली दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आजही जशास तशा अवस्थेत कायम आहेत. या वेदनांसाठी तेव्हा असलेलं कर्जबाजारीपणाचे कारण आजची तसेच आहे. यावर मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची गरज आहे, याच भावनेतून लातूर जिल्ह्यातील एक शेतकरी पेटून उठला आहे. सर्व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना कर्जाच्या विळख्यातून मोकळे करा, अशी या शेतकऱ्याची मागणी आहे. मात्र या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी या शेतकऱ्याने चक्क खांद्यावर नांगर घेऊन पायी चालत थेट मंत्रालयाची वाट धरली आहे. खांद्यावर नांगर, पाठीवर जीवनावश्यक वस्तू असलेली बॅग आणि हातात पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन हा शेतकरी चालत मंत्रालयाच्या दिशेने निघाला आहे. 

आतापर्यंत सलग दहा दिवसात तब्बल ५०० किलोमीटरचा पायी प्रवास करत ठाणे जिल्ह्यात पोहोचला आहे. दरम्यान, चालून चालून पायाला झालेल्या गंभीर जखमा, अशक्तपणा व रक्तातील साखरेची पातळी (शुगर) वाढल्याने या शेतकऱ्याला दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी ठाणे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

सहदेव व्होनाळे असे या शेतकऱ्याचे नाव असून ते ४५ वर्षाचे  आहेत. मराठवाड्यातील धानोरा (ता. अहमदपूर, जिल्हा लातूर) हे त्यांचं गाव आहे. ते खांद्यावर नांगर घेऊन मुंबईकडे ते चालत निघाले आहेत. त्यांनी दि. ४ जुलै २०२५ रोजी सकाळी दहा वाजता धानोरा येथून हा प्रवास सुरू केला. ते दि. १३ जुलै २०२५ रोजी ठाणे जिल्ह्यात पोहोचले आणि दि. १४ जुलै रोजी मंत्रालयात पोहोचण्याचे नियोजन त्यांनी केले होते. मंत्रालयात पोहोचण्याच्या एक दिवस आधीच त्यांना ठाणे येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्या मदतीसाठी चाकूर तालुक्यातील झरी (जि. लातूर) येथील गणेश सुर्यवंशी ठाण्यात पोहोचले आहेत. 

दरम्यान, दि. १३ जुलैपासून या शेतकऱ्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे मंत्रालय त्यांच्यापासून अद्याप दूरच राहिले आहे. लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील एक वृद्ध शेतकऱी नांगराला स्वतःला जुंपून घेऊन त्याच्या जमिनीची नांगरणी करत असतानाचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर  राज्य सरकारने लगेचच त्यांना 40 हजाराची मदत देऊन दखल घेतली. मात्र हा एका शेतकऱ्याचा प्रश्न नसून सगळ्यांचाच आहे, याकडे सरकारचे लक्ष वेधले जावे आणि त्यातून सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल घ्यावी, या उद्देशाने त्यांनी पदयात्रा काढली आहे. राज्यातील वारकऱ्यांची सगळी पावले पंढरीकडे चालली असताना ही दोन पावले मात्र मुंबईकडे निघाली आहेत, असाच संदेश या पदयात्रेतून गेला आहे. 

सहदेव व्होनाळे पदव्युत्तर पदवीधारक आहेत. शिवाय त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पत्रकारितेतील पदवी प्राप्त केली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही काळ सरकारी नोकरी केली आहे. शिवाय काही काळ अधिव्याख्याता म्हणून काम आणि पत्रकारिताही केलेली आहे. लातूर ते मुंबई या पायी प्रवासात बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांनी त्यांची भेट घेतली व यावेळी हबीब यांनी व्होनाळे यांना त्यांची शेतकरीविरोधी कायदे ही पुस्तिका भेट दिली. शेतकरी प्रश्न समजावून घेण्याची त्यांची जिज्ञासा आणि ते प्रश्न सुटावेत म्हणून वाटणारी तळमळ महत्वाची वाटल्याचे मत अमर हबीब यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्रातील शेतकरी हे कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. त्यामुळे आजही शेतकऱ्यांची अवस्था खुपच दयनीय आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे गरजेचे आहे. या मागणीसाठी मागील दोन वर्षांपासून सातत्याने विविध मार्गांनी आंदोलन करत आहे. तरीही सरकार या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. यामुळे सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधून घेण्यासाठी पदयात्रेद्वारे मंत्रालयात पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. 

- सहदेव व्होनाळे, 
पदयात्री आंदोलक.