The revenue administration really showed the revenue minister the stars in broad daylight :- जिल्हा महसूल प्रशासनाने चक्क महसूलमंत्र्यांनाच दाखवले 'दिवसा तारे'!

महसूल मंत्र्यांचा चौकशीचा आदेश मिळण्याआधीच चौकशी केली पूर्ण : पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील चौकशीचा अजब प्रकार उघड

The revenue administration really showed the revenue minister the stars in broad daylight :- जिल्हा महसूल प्रशासनाने चक्क महसूलमंत्र्यांनाच दाखवले 'दिवसा तारे'!
पुणे :- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा 

पुणे, दि. १० जुलै २०२५ :- साधारणतः एखाद्या विषयाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी आधी कोणीतरी लेखी तक्रार दाखल करावी लागते. मग ही तक्रार गंभीर असेल तर, चौकशी करून वरिष्ठांना त्याबाबतचा अहवाल सादर केला जातो. आणि अहवालानुसार संबंधितावर कारवाई केली जाते, अशी ही प्रशासनातील कामकाजाची पद्धत आहे. मात्र यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात अपवाद ठरले आहे. येथील एका वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्याविरूद्ध  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आलेल्या तक्रारीची चक्क महसूलमंत्र्यांचा आदेश मिळण्या आधीच चौकशी पूर्ण करून संबंधित अधिकाऱ्याला क्लीनचीट देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे खुद्द तक्रारदार संभ्रमात पडले आहेत. शिवाय पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या या कृतीतून जिल्हा महसूल प्रशासनाने चक्क राज्याच्या महसूल मंत्र्यांनाच दिवसा तारे दाखविण्यात आल्याची खमंग चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात मोठ्या चवीने केली जाऊ लागली आहे‌. 

राज्याच्या महसूल मंत्र्यांकडे केलेली तक्रार पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आली नाही. कोणी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे तोंडी किंवा लेखी तक्रारही दाखल केलेली नाही. तरीही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दाखल झालेल्या लेखी तक्रारीची चौकशी करण्याबाबतचा आदेशही जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळालेला नाही. तरीही या प्रकरणाची चौकशी कशाच्या आधारे करण्यात आली व जिल्हाधिकारी कार्यालयाला काहीच माहिती नसलेल्या या प्रकरणात कशी काय क्लीनचिट देण्यात आली, आदी प्रश्न हे महसूल मंत्र्यांकडे तक्रार दाखल केलेल्या तक्रारदार प्रफुल्ल कोठारी यांना पडले असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचं झालं असं की जिल्हाधिकारी कार्यालयातील एका वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्याने त्यांच्याच दालनात प्रफुल्ल कोठारी यांना अवमानकारक वागणूक दिली. मे २०२५ मध्ये हा प्रकार घडला. अवमानकारक वागणुकीमुळे संतप्त झालेल्या कोठारी यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लगेच लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत बावनकुळे यांनी या वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्यासह तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा लेखी आदेश पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना २८ मे २०२५ रोजी दिला आहे. पण बावनकुळे यांचा लेखी आदेश मिळण्याच्या आदल्या रात्रीच असं काही घडलंच नाही. त्यामुळे या प्रकरणात संबंधित उपजिल्हाधिकाऱ्याला क्लीनचिट देण्यात यावी, असा अहवाल जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी राज्याच्या महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पाठवला आहे. यातूनच महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आदेश मिळण्याआधीच चौकशी पूर्ण केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ उपजिल्हाधिकाऱ्याने एका सामान्य नागरिकाला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीची चौकशी करण्याचा लेखी आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेला आहे. त्यांनी याबाबतचे लेखी पत्र विभागीय आयुक्तांना पाठविले आहे. परंतु ही चौकशी सुरू होण्यापूर्वीच संबंधित उपजिल्हाधिकारी यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना खोटी माहिती देऊन, त्यांची दिशाभूल केली आहे. महसूल मंत्र्यांचा चौकशीचा आदेश मिळण्याआधीच या प्रकरणात तथ्य नसल्याचे सांगून जिल्हाधिकारी यांनी तसा अहवाल महसूल मंत्र्यांना पाठवला आहे. ही चौकशी बंद करण्याचेही त्यांनी या अहवालात नमूद केले आहे. हा प्रकार म्हणजे चक्क महसूल मंत्र्यांच्या आदेशालाच आव्हान देणारा आहे. शिवाय चौकशी पूर्ण होण्या आधीच त्यावर पांघरूण घालण्याचा हा प्रयत्न आहे. 

- प्रफुल्ल कोठारी 
तक्रारदार, पुणे.