India’s Fake Goods Crisis: देशातील वाढत्या बनावट उत्पादनांबाबत 'ASPA-CRISIL'चा धक्कादायक अहवाल; ८९% शहरी ग्राहकांनी आयुष्यात कधी ना कधी बनावट उत्पादन खरेदी केल्याची कबुली.

ASPA–CRISILच्या अहवालानुसार भारतात बनावट उत्पादनांचे जाळे झपाट्याने वाढत असून सुमारे ८९ टक्के शहरी ग्राहकांनी आयुष्यात किमान एकदा तरी नकली माल खरेदी केल्याची कबुली दिली आहे.

India’s Fake Goods Crisis: देशातील वाढत्या बनावट उत्पादनांबाबत 'ASPA-CRISIL'चा धक्कादायक अहवाल; ८९% शहरी ग्राहकांनी आयुष्यात कधी ना कधी बनावट उत्पादन खरेदी केल्याची कबुली.

नवी दिल्ली — देशात बनावट उत्पादनांचे प्रमाण गंभीर स्तरावर पोहोचल्याचे चित्र Authentication Solution Providers’ Association (ASPA) आणि CRISIL यांच्या ‘State of Counterfeiting in India 2022’ या संयुक्त अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार, शहरी भागातील जवळपास ८९ टक्के ग्राहकांनी बाजारात बनावट किंवा नकली उत्पादनांचे मोठ्या प्रमाणात अस्तित्व असल्याचे मान्य केले असून, ग्राहकांच्या जाणिवेनुसार भारतीय बाजारपेठेतील सुमारे २५–३० टक्के हिस्सा बनावट उत्पादनांचा असू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ASPA–CRISILच्या या अहवालासाठी १२ प्रमुख शहरांतील ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्यांचा स्वतंत्र सर्वेक्षणाद्वारे अभ्यास करण्यात आला. दिल्ली, आग्रा, जालंधर, मुंबई, अहमदाबाद, जयपूर, इंदूर, कोलकाता, पटणा, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबाद या शहरांतील प्रतिसादांवर आधारित या अभ्यासातून FMCG, वस्त्र, अ‍ॅग्रोकेमिकल्स, औषधे, ऑटोमोबाईल पार्ट्स आणि कंझ्युमर ड्युरेबल्स या क्षेत्रांवर बनावट उत्पादनांचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे निदर्शनास आले. FMCG, अ‍ॅपेरल आणि कृषी रसायन क्षेत्रांत बनावट उत्पादनांचे प्रमाण अंदाजे ३० टक्क्यांपर्यंत, तर औषधे, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्ससारख्या क्षेत्रांत हे प्रमाण २०–२५ टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे अहवालात नमूद आहे.

सर्वेक्षणातील एका महत्त्वाच्या निष्कर्षानुसार, “जवळपास ८९ टक्के ग्राहकांना बाजारात बनावट वस्तूंचे अस्तित्व मान्य आहे आणि किंमतीबाबतची जास्त संवेदनशीलता, मूळ उत्पादनांची कमतरता, लक्झरी ब्रँडची इच्छा, पीअर प्रेशर आणि सामाजिक प्रतिष्ठा दाखवण्याची मानसिकता या कारणांमुळे अनेक ग्राहक नकळत किंवा कधीकधी जाणूनबुजूनही अशा वस्तू खरेदी करतात,” असे निरीक्षण नोंदवले गेले आहे. तसेच, सुमारे २७ टक्के ग्राहकांना खरेदीच्या वेळी आपल्याकडे असलेली वस्तू बनावट आहे, याची जाणीवच नसल्याचेही अहवालात म्हटले आहे.

ASPA–CRISILने उद्योग क्षेत्राने सिक्युरिटी फीचर, ऑथेंटिकेशन सोल्यूशन्स आणि ट्रेसेबिलिटी तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केला असला, तरी ग्राहकांपर्यंत त्या बाबत पुरेशी माहिती न पोहोचल्याने फसवणुकीला वाव मिळत असल्याचा इशारा दिला आहे. ASPA आणि CRISIL यांचा पुढील ‘State of Counterfeiting in India 2025’ हा अद्ययावत अहवाल १६ मार्च २०२६ रोजी मुंबईत होणाऱ्या TAF Connect या परिषदेत सादर होणार असून, त्यातून या समस्येचे नवे पैलू आणि उपाययोजना पुढे येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.