Real Crime Story: प्रोटेक्टर की प्रेडेटर? जेव्हा रक्षकच बनले भक्षक, देशाला हादरवणारा कस्टोडियल मर्डर

फक्त काही मिनिटं उशिरा दुकान बंद केल्याची शिक्षा – पोलिस स्टेशनच्या चार भिंतीत बाप‑लेकावर झालेलं अंगावर शहारे आणणारं टॉर्चर आणि सातानकुलम कस्टोडियल मर्डरची संपूर्ण रिअल क्राइम स्टोरी.

Real Crime Story: प्रोटेक्टर की प्रेडेटर? जेव्हा रक्षकच बनले भक्षक, देशाला हादरवणारा कस्टोडियल मर्डर

रात्री आठ वाजून काही मिनिटं झाली होती. सातानकुलमच्या त्या अरुंद रस्त्यावर, लॉकडाऊनचे नियम कडक होते, रस्त्यांवर शांतता होती, आणि फक्त एका छोट्याशा मोबाईल अ‍ॅक्सेसरीज दुकानाच्या शटरसमोर एक माणूस उभा होता – मास्क लावलेला, अंगावरचा शर्ट थोडा घामाने ओला झालेला. तो होता – सुब्रमण्यम जयराज, वय ५९.

त्याच्यासाठी हा दिवस इतर दिवसांपेक्षा वेगळा नव्हता. कर्फ्यू थोडासा ओलांडून दुकान बंद केलं, एवढाच “गुन्हा”. पण त्या रात्री, दोन पोलिसांच्या येण्यानं, आणि नंतर एका बंद दरवाज्यानं, जयराज आणि त्याचा मुलगा बेन्निक्स यांचं जीवन कायमचं अंधारात ढकललं जाणार होतं – अशा अंधारात, जिथे कायदा, न्याय आणि मानवता या तिन्हींचे डोळे बांधलेले होते.


दोन मिनिटांचा उशीर, आणि नऊ माणसांच्या हातातली सत्ता

१९ जून २०२० – तामिळनाडूतील सातानकुलम. CCTV कॅमेऱ्यांनी जितकं पाहिलं, तितकंच खरं इतिहासात नोंदून राहिलं.
रेकॉर्डिंगमध्ये आपण पाहतो – जयराज दुकानाबाहेर शांत उभा आहे, आसपास कोणी ग्राहक नाही, रस्ता जवळजवळ निर्मनुष्य आहे. लॉकडाऊनचा कर्फ्यू नुकताच लागू झाला आहे, पण प्रत्यक्षात ते दृश्य तुम्हाला एखाद्या साध्या गावातल्या रात्रीसारखं साधं वाटेल.

काही क्षणांत दोन पोलिस फ्रेममध्ये येतात. ते जयराजशी बोलतात, इशारे करतात, आणि निघून जातात. हे पहिल्या नजरेत काहीच विशेष वाटत नाही – रोजच्या “चेकिंग”सारखं. पण पुढच्या काही मिनिटांत चित्र बदलतं. पोलिसांची गाडी थांबते. जयराज गाडीपाशी जातो, काही शब्दांची देवाणघेवाण होते. आवाज CCTVमध्ये नोंदला जात नाही, पण हालचालींवरून, हातवारे पाहून, वाद वाढत असल्याचं दिसतं. रस्त्याच्या कडेला काही शेजारी बाहेर येऊ लागतात, दुकानातून बेन्निक्स धावत येतो. पोलिस जयराजला गाडीत जबरदस्ती बसवतात.

हे पोलिसांच्या नजरेत “फक्त कर्तव्य” असेल. पण जयराजच्या मुलाच्या नजरेत ते त्याच्या वडिलांचं अपहरण होतं. आणि त्याच क्षणी, एका साध्यासारख्या दिसणाऱ्या रात्रीचा “क्राइम स्टोरी”मधला पहिला सीन पूर्ण होतो.


सातानकुलम पोलिस स्टेशन – बाहेर थंड, आत पेटलेलं नरक

बेन्निक्स, वय ३१, वडिलांच्या मागोमाग पोलिस स्टेशनात पोहोचतो. कुठल्याही मुलासारखीच त्याची प्रतिक्रिया – “माझ्या बापाला मारू नका.” पण इगोला सामोरा जाताना पोलिसांचा चेहरा वेगळा असतो. स्टेशनच्या आत सब‑इन्स्पेक्टर बालकृष्णन जयराजला मारत असतो. बेन्निक्स मध्ये पडतो, शब्द जोरात होतात, नजरा बदलतात. तेवढ्यात दरवाजा बंद होतो. बाहेरचा आवाज बंद; आतला आवाज वाढायला मोकळा. इन्स्पेक्टर एस. श्रीधर, सब‑इन्स्पेक्टर रघू गणेश आणि इतर पोलिस – जवळपास दहाजण – आता दोन माणसांच्या शरीरावर आणि त्यांच्या असहाय्यतेवर स्वामित्व गाजवणार होते. हे चौकशी नव्हतं. हे vengeance होतं – “तू आमचं ऐकलं नाहीस” या अहंकारावर उभं असलेलं हिंसक नाटक.

हे नाटक नंतर दोन महिला साक्षीदारांच्या डोळ्यांतून कोर्टात उभं राहील – हेड कॉन्स्टेबल रेवती आणि स्टेशन रायटर सेल्वा कुमारी. त्यांच्या म्हणण्यानुसार, पुढची जवळजवळ सात तास, जयराज आणि बेन्निक्स या दोघांवर इतका अत्याचार झाला, की त्यांच्या किंकाळ्या स्टेशनपासून अर्धा किलोमीटर दूरपर्यंत पोचत होत्या. कपडे उतरवले गेले. शरीरं उघडी पडली. लाठ्या उचलल्या, आवाज ऐकून “आज थांबू या” असं न म्हणता, उलट “सगळं संपेपर्यंत” असा निश्चय केला गेला.

इन्स्पेक्टर श्रीधर फक्त पाहत नव्हता; तो cruelty चा कोरीओग्राफर होता. “टेबलवर उलटं झोपा… आता मारा.” – नवीन पद्धती सुचवत, तो हिंसेचा टेंपो वाढवत होता. रघू गणेश त्यांना चिडवत म्हणत होता, “खरी मार तर आता सुरू होईल.” जखमांमधून रक्त वाहत होतं. खालच्या भागातून होणाऱ्या रेक्टल ब्लीडिंगमुळे, दोघांना किमान सहा वेळा त्यांची गडद रंगाची lungi बदलायला लावली गेली – जेणेकरून बाहेर येताच रक्त दिसणार नाही. कुठेतरी जयराजला इतकी तहान लागते, की तो पाण्यासाठी विनवतो. त्या नरकातही रेवतीचा मनुष्यपणा जागा राहतो; ती त्याला पाणी देते – आणि त्याच रात्री आपल्या नवऱ्याला फोन करून आत काय सुरू आहे ते सांगते. जबरदस्ती, humiliation, मार – आणि शेवटी, स्वतःच्या कपड्यांनीच जमिनीवरील रक्त पुसायला लावणं. हा आता गुन्हा नसतो, ही एक deliberate breaking of spirit असते – शरीर मोडण्यापूर्वी आत्मा मोडण्याची.


‘फिटनेस सर्टिफिकेट’ – मृत्यूला दिलेला सरकारी शिक्का

पुढच्या पहाटेपर्यंत जयराज आणि बेन्निक्स दोघांचं शरीर जवळजवळ निष्क्रिय झालेलं असतं. स्वतः उभं राहणं कठीण, चालणं तर दूरच. हे बघून कोणतीही प्रणाली पहिली गोष्ट काय करेल? रुग्णालय. उपचार. पण इथे सिस्टमचा पहिला चेहरा दिसतो – cover‑up. दोघांना सातानकुलम सरकारी रुग्णालयात नेलं जातं – पण “ट्रीटमेंट”साठी नव्हे, तर फक्त एक कागदासाठी: मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. सरकारी गाडीऐवजी खासगी वाहन वापरलं जातं, जेणेकरून गाडीत रक्त पडलं तरी, नंतर सहज साफ करता येईल.

डॉक्टर वेणिला त्यांची अवस्था पाहते. त्यांच्या जखमा, सूज, चालताना होणारी तडफड – सगळं तिला दिसतं. तरीही ती त्यांना भरती करत नाही, ICUमध्ये पाठवत नाही; फक्त “फिट” असल्याचा अहवाल लिहून देते. याच सर्टिफिकेटच्या आधारावर पुढचा डाव खेळला जातो. त्यांना मजिस्ट्रेट डी. सर्वानंद यांच्या समोर नेलं जातं. कायद्यानुसार, मजिस्ट्रेटने प्रत्यक्ष जखमा पाहून, पोलिसांवर प्रश्न विचारून, गरज पडल्यास त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी किंवा पोलिस कस्टडीतून बाहेर करण्याचा अधिकार वापरायचा असतो.

पण इथे कोविड प्रोटोकॉलचा पडदा लावला जातो. मजिस्ट्रेट आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावर उभे राहतात, खाली उभ्या जखमी जयराज‑बेन्निक्सकडे फक्त पाहून हात हलवतात – आणि त्यांना न्यायिक कोठडीत पाठवतात. एकही प्रश्न नाही. एकही जवळ येऊन पाहिलेला जखमी पाठीचा भाग नाही. या दरम्यान, पोलिस स्टेशनमध्ये दुसराच खेळ सुरू असतो. एक बनावट FIR लिहिण्यात येते – जयराज आणि बेन्निक्सने पोलिसांना शिवीगाळ केली, स्वतःच पडून जखमी झाले, झटापटीत स्वतःला मार लागला. रक्त अजूनही सुटलेलं असतं. फक्त गोष्टींची भाषा बदललेली असते.


दोन मृतदेह आणि देशभरात उसळलेलं अस्वस्थ मौन

जयराज आणि बेन्निक्सना जवळच्या जेलमध्ये न ठेवता, खूप अंतरावर असलेल्या कोविलपट्टी सब‑जेलमध्ये हलवलं जातं. कुटुंबाला भेटणं अवघड व्हावं, तक्रारी, अर्ज, दबाव – सगळं कमी पडावं, ही योजना. जेलमध्ये दोघांची तब्येत सतत खालावत जाते. तरीही त्यांना तातडीचा वैद्यकीय उपचार देण्यात उशीर होतो. २२ जूनच्या संध्याकाळी बेन्निक्सच्या छातीत तीव्र वेदना सुरू होतात. त्याला अखेर सरकारी रुग्णालयात नेलं जातं, पण तेव्हा शरीरातल्या अत्याचाराने केलेली हानी खूप दूरवर गेलेली असते. रात्री उशिरा बेन्निक्सचा मृत्यू होतो – कारण म्हणून वैद्यकीय अहवालात लिहिलं जातं: “जोरदार मारहाणीतून झालेला मॅसिव्ह इंटरनल ब्लीडिंग आणि ब्लंट फोर्स ट्रॉमा.”

त्याच रात्री, जयराजला देखील रुग्णालयात भरती केलं जातं. त्याच्या फुफ्फुसांवर परिणाम, श्वास घेण्यातील त्रास – आणि २३ जूनच्या पहाटे त्याचा देखील अंत होतो.

दोन मृतदेह.
दोन नावं.
एक कुटुंब उद्ध्वस्त.

सिस्टमच्या नजरेत हे “दोन आरोपींची नैसर्गिक मृत्यू” असू शकते. पण जयराजची पत्नी, मुलगी आणि बेन्निक्सचा चेहरा विसरू न शकणारा समाज – त्यांच्या नजरेत हा सरळसरळ “कस्टोडियल खून” होता.


रस्त्यावर उतरणारी माणसं, स्क्रीनवर पेटणारा आवाज

सातानकुलममध्ये लोकांनी दुकानं बंद ठेवली. ते फक्त शटर खाली ओढत नव्हते, ते आपल्या मनातल्या संतापाला एक मूक भाषांतर देत होते. काही दिवसांत, हे प्रकरण तामिळनाडूभर आणि मग देशभर पोहोचतं. रेडिओ जॉकी सुचित्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो – जयराज आणि बेन्निक्सवर झालेली क्रूरता, जखमा, रक्त, आणि सिस्टमचा मौन यावर केलेलं त्यातलं भाष्य लोकांना अस्वस्थ करून सोडतं. “Justice for Jayaraj & Bennix” हा हॅशटॅग ट्रेंड होतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरही या केसची चर्चा होऊ लागते; काही जण या प्रकरणाची तुलना जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येशी करतात.

दरम्यान, सरकार आणि पोलिस यंत्रणा पहिला प्रतिसाद देतात – दोन सब‑इन्स्पेक्टर सस्पेंड, इन्स्पेक्टर श्रीधरला “वेटिंग लिस्ट”. राज्य सरकारकडून मृत्यूचे कारण “आजारीपणा” म्हटलं जातं, आणि फक्त १ लाख रुपये नुकसानभरपाई, एका नोकरीची घोषणा करून फाईल बंद करण्याचा प्रयत्न होतो. पण हा केस बंद करणे सोपं नव्हतं. या वेळी प्रेशर रस्त्यावरच्या लोकांपुरतं मर्यादित नव्हतं – तो स्क्रीनवर, मोबाईलवर, प्रत्येक टाईमलाइनवर होता.


न्यायालयीन कोरिडॉरमध्ये येणारा सत्याचा आवाज

डिजिटल प्रेशर, सार्वजनिक रोष आणि सतत विचारले जाणारे प्रश्न – “हे कस्टोडियल डेथ नाही का?” – यांच्या पार्श्वभूमीवर मद्रास हायकोर्टाच्या मदुराई बेंचने स्वतःहून (suo motu) या प्रकरणाची दखल घेतली. कोर्टाने जिल्ह्याच्या SPला ताबडतोब हजर राहण्याचे आदेश दिले, आणि दोन दिवसांत तपशीलवार अहवाल मागवला. पोस्टमॉर्टमसाठी तीन डॉक्टरांचा पॅनेल नेमण्यात आला; संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंगसह, मजिस्ट्रेटच्या उपस्थितीत करण्याचे निर्देश देण्यात आले. या पोस्टमॉर्टमध्ये जयराज आणि बेन्निक्सच्या शरीरावर किमान १८ स्पष्ट, खोल जखमा नोंदवल्या गेल्या – सुजलेली त्वचा, खालच्या भागांवरील सोललेली त्वचा, आणि मारहाणीचा सततचा ठसा. हे “स्वतः पडून झालेल्या जखमा” असल्याचा पोलिसांचा दावा, वैद्यकीय भाषेत त्या दिवशीच खोटा ठरतो.

स्थानिक CBCIDकडून तपास होत असताना, पुरावे लपवले जातील, CCTV फुटेज नष्ट होईल, अशी भीती कोर्टाला वाटते. म्हणूनच केस CBIकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला जातो. एक महत्त्वाचं दृश्य तेव्हा घडतं – जिल्हाधिकारी, ताळमेळ अधिकारी, आणि न्यायालयाचे प्रतिनिधी स्वतः सातानकुलम पोलिस स्टेशनचा ताबा घेतात. स्टेशन, जे आतापर्यंत “टॉर्चर चेंबर” होतं, ते आता “क्राइम सीन” म्हणून सील केलं जातं.


भिंतींवरील रक्त, डिजिटल डिलीट आणि फॉरेन्सिक सत्य

दिल्ली येथील सेंट्रल फॉरेंसिक सायन्स लॅबची टीम सातानकुलम पोलिस स्टेशनमध्ये दाखल होते. त्यांच्यासाठी हे फक्त केस फाईलवर लिहिलेलं नाव नव्हतं, तर वैज्ञानिकदृष्ट्या उत्तर देण्याची जबाबदारी होती – “हो, इथे खून झाला आहे.” लॉक‑अपमधून, टॉयलेटमधून, स्टेशन हाऊस ऑफिसरच्या रूममधून, टेबल, भिंती, मजले – सगळीकडून रक्ताचे नमुने गोळा केले जातात. हे नमुने जयराज आणि बेन्निक्स यांच्या रक्ताने माखलेल्या कपड्यांशी तुलना केली जातात – आणि DNA प्रोफाइलिंग स्पष्ट दाखवतं, की स्टेशनमध्ये सापडलेलं रक्त त्यांचंच आहे. जप्त केलेल्या लाठ्यांवरचं रक्तही त्यांच्याच शरीरातून आलेलं आहे, हे वैज्ञानिकरीत्या सिद्ध होतं.

आणखी एक पाप उघड होतं – स्टेशनमध्ये CCTV कॅमेरे असतात, पण रेकॉर्डिंग अशी सेट केली होती, की फुटेज दररोज आपोआप डिलीट होईल. त्या रात्रीचं फुटेज नाहीसं झालेलं असतं. जाणूनबुजून, तपासात एक बहिरा‑मुका साफसफाई कामगार समोर येतो – पोलिसांनी त्याला स्टेशनमधील रक्ताचे डाग धुवायला लावले होते. त्याचा जबाब, त्याची पत्नी मधे राहून दिलेली माहिती, CBIच्या चार्जशीटमध्ये महत्त्वाच्या पुराव्याप्रमाणे सामील होते.

७ जुलै २०२० रोजी CBI दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवते आणि सातानकुलम पोलिस स्टेशनमधील एकूण १० पोलिसांना अटक करते – त्यात इन्स्पेक्टर, सब‑इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल, सर्वांचा समावेश असतो. तपासादरम्यान एका सब‑इन्स्पेक्टरचा – पाल थुराई – आजारपणामुळे मृत्यू होतो. ६ सप्टेंबर २०२० रोजी दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये कटकारस्थान, खून, बेकायदेशीर अटक, पुरावे नष्ट करणे अशी गंभीर कलमे ठोकली जातात.


दोन महिलांचा धैर्यवान जबाब – ‘इनसाइडर’ साक्ष

या गुन्ह्याला “कस्टोडियल डेथ” न राहू देता “कस्टोडियल मर्डर” म्हणून सिद्ध करण्यासाठी दोन साक्षी निर्णायक ठरतात – हेड कॉन्स्टेबल रेवती आणि स्टेशन रायटर सेल्वा कुमारी. रेवतीने त्या रात्री आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं – कशा प्रकारे जयराजचा श्वास तोडला जात होता, कशा प्रकारे बेन्निक्सला उभा राहणंही अशक्य होईपर्यंत मारलं जात होतं. तिने त्यांना पाणी दिलं, नंतर आपल्या नवऱ्याला फोन करून “स्टेशनमध्ये नरक उघडलाय” असं सांगितलं. कोर्टात, मजिस्ट्रेटसमोर जबाब देताना, आरोपी पोलिस बाहेर उभे राहून तिच्या प्रत्येक शब्दावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. तरीही रेवतीने सच्चाईवर सही केली.

फॉरेन्सिक टीम जेव्हा स्टेशनमध्ये आली, तेव्हा याच महिलांनी त्यांना नेमक्या जागा दाखवल्या – कुठल्या भिंतीवर रक्त होते, कुठल्या टेबलावर, कुठल्या कोपऱ्यात. DNA रिपोर्टने त्यांचं म्हणणं पुष्ट केलं – आणि अशा प्रकारे त्या दोघींचे जबाब, वैद्यकीय पुरावे आणि फॉरेन्सिक निष्कर्ष एकाच दिशेने बोट दाखवू लागले. मद्रास हायकोर्टाने स्पष्टपणे नोंदवलं – रेवती आणि सेल्वा कुमारी यांच्या साक्षींवरून प्रथमदर्शनी हे स्पष्ट होतं की, हा सरळसरळ कस्टोडियल मर्डर आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी तातडीचे आदेश दिले गेले, कारण त्यांनी ज्या संस्थेविरुद्ध आवाज उठवला होता, त्या संस्थेतच त्या नोकरीला होत्या.


पाच वर्षांची लढाई, एक निर्णायक शब्द – “फाशी”

पुढची पाच वर्षं हा केस केवळ कागदावर नव्हता, तो कोर्टात, मीडिया रिपोर्ट्समध्ये, लोकांच्या आठवणीत जिवंत होता. आरोपी पोलिसांचे जामीन अर्ज परत परत फेटाळले गेले. २३ मार्च २०२६ रोजी मदुराई येथील फर्स्ट अ‍ॅडिशनल डिस्ट्रिक्ट अ‍ॅण्ड सेशन्स कोर्टाने उरलेल्या नऊ पोलिसांना दोषी ठरवलं. त्यांच्यावर खून, बेकायदेशीर अटक, पुरावे नष्ट करणे अशा गंभीर गुन्ह्यांत दोष सिद्ध झाला.

६ एप्रिल २०२६ – न्यायमूर्ती जी. मुथुकुमारन कोर्टात आपला निर्णय वाचतात. ते म्हणतात – हा “रेअरेस्ट ऑफ रेर” प्रकार आहे; जिथे लोकांचे रक्षण करण्याची शपथ घेतलेले लोकच भक्षक बनले, आणि सूडाने पेटलेल्या गटाने एका बाप‑लेकाला निर्दयपणे मारून टाकले. न्यायालय नऊही दोषींना फाशीची शिक्षा सुनावते, आणि एकूण १ कोटी ४० लाख रुपयांचा दंड ठोठावते, जो पीडित कुटुंबाला देण्यात येणार आहे. जयराजची पत्नी सेल्वा राणी आणि मुलगी पर्सिस यांच्या डोळ्यांत अश्रू असतात – यात दु:खही असतं, आणि काही वर्षांनी का होईना, मिळालेल्या न्यायाची हलकी सावलीही.

निकाल वाचून झाल्यावर, न्यायाधीश स्वतःच्या पेनची निब तोडून टाकतात – या फाइलवरचा हा निर्णय अंतिम आहे, असा एक प्रतिकात्मक संदेश. परंतु, कोर्टाबाहेर येणाऱ्या नऊ पोलिसांच्या चेहऱ्यावर दिसणारे स्मित मात्र अस्वस्थ करणारं असतं. ते जणू काही म्हणत असतात – “अपील्स आहेत, सिस्टम आहे, खेळ अजून संपलेला नाही.” तिथेच या गुन्हेगारी कथेला न्यायालयीन शेवट मिळाला असला, तरी लोकांच्या मनात एक नवीन प्रश्न जन्माला येतो – फाशीच्या या शब्दामध्ये आपण खरंच सुरक्षित आहोत, की ही फक्त एका केसची फाइल बंद झाली आहे?


शेवटचा अध्याय: गुन्हा संपला, की फक्त कागदावर संपल्याचं लिहिलं गेलं?

सातानकुलम केस फक्त एका पोलिस स्टेशनची कहाणी नाही. ही एक पूर्ण सिस्टीमची कथा आहे – जिथे एका टोकाला दहा पोलिस आहेत, तर दुसऱ्या टोकाला एक डॉक्टर, एक मजिस्ट्रेट, आणि सुरुवातीला सर्व काही लपवण्याचा प्रयत्न करणारी सत्ता आहे. हो, नऊ पोलिसांना फाशीची शिक्षा झाली. हो, जयराज आणि बेन्निक्स यांच्या नावांसोबत “न्याय” हा शब्द जोडला गेला. पण अजूनही अनेक कस्टोडियल डेथ्स अशीच, नोंद न होऊन, आवाज न उठता, सोशल मीडियावर ट्रेंड न होता, कुठल्या तरी फाईलच्या आत अडकून पडलेली आहेत.कदाचित या कथेतला सर्वात मोठा गुन्हा हा आहे – आपण केवळ त्या दोन मिनिटांच्या कर्फ्यू ब्रेकलाच “गुन्हा” म्हणत बसलो, आणि जिथे कायदा लोकांना वाचवायला हवा होता, तिथे कायदा धारण केलेल्या हातांनीच त्यांच्या हाडा‑मांसाला तोडलं.

सातानकुलमच्या त्या रात्रीपासून आजपर्यंत, फक्त एक प्रश्न अजूनही हवेत तरंगतो –
पुढचा जयराज कोण नसेल याची हमी कोण देणार?