... आता स्वर्गीय शिवाजीराव पोमणसारखा कार्यकर्ता होणे अशक्य, उपमुख्यमंत्री अजित पवार
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानतर्फे आदर्श पुरस्कार : शेंडकर, भगत आणि कटके यांचा गौरव
ग्रामराज्य वृत्तसेवा
पुणे, दि. ६ जून २०२५ :- पुरंदर तालुक्यातील स्वर्गीय शिवाजीराव पोमण यांनी सरपंच, पंचायत समिती आणि पक्ष संघटनेत विविध पदांवर काम केले.पोमण हा तळागाळातल्या नागरिकांना न्याय देणारा, जमिनीवर पाय ठेवून काम करणारा कार्यकर्ता होता. लोकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांना मदत करणारा कार्यकर्ता अशी पोमण यांची ओळख होती. आता असा कार्यकर्ता होणे अशक्य आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.६ जून) येथे बोलताना व्यक्त केले.
वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्यावतीने स्वर्गीय शिवाजीराव पोमण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमर्डीच्या सरपंच सौ. मंदाताई शेंडकर यांना आदर्श सरपंच, राजुरीचे माजी सरपंच उद्धव भाऊसाहेब भगत व भिवरीचे माजी सरपंच दिलीप कटकेंना आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी मारुती किंडरे, स्वर्गीय शिवाजी पोमण यांच्या पत्नी श्रीमती शमा पोमण, मुलगा शंभू पोमण, कुंभारवळण गावचे माजी सरपंच सचिन पठारे, आस्करवाडी गावचे सरपंच जालिंदर वाडकर, सोमर्डी गावचे माजी सरपंच शांताराम भोराडे, भाजप किसान मोर्चाचे अध्यक्ष संदीप ऊर्फ पांडुरंग देवकर, पुरंदर तालुका भाजप पश्चिम मंडल अध्यक्ष संदीप कटके, किरण कटके, मनोहर घिसरे ,गोसावी बुवा मंडळ अध्यक्ष शेखर कटके, राजेंद्र ताम्हाणे आदी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, "लोकांच्या कामांसाठी सहज उपलब्ध होणारा कार्यकर्ता अशी पोमण यांची खऱ्या अर्थाने ओळख होती. त्यांच्या स्मृतींची आठवण कायम रहावी आणि त्यांच्या स्मृती खऱ्या अर्थाने जपण्याचे काम वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्यावतीने व जालींदर कामठे यांच्या माध्यमातून होत आहे, हे कौतुकास्पद आहे."
मागील आठवड्यात झालेल्या या पुरस्कार वितरण समारंभाला अजित पवार येऊ शकले नाहीत. जुन्नरमध्ये त्यांचा एक कार्यक्रम सुरू होता. परंतु त्या दिवशी प्रचंड पाऊस असल्यामुळे जुन्नर ते पुरंदर असा हेलिकॉप्टरने प्रवास करणे अडचणीचे ठरत होते. हेलिकॉप्टर उतरण्यासाठी अडचण निर्माण होत होती. परंतु शिवाजी पोमण यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारार्थ्यांचा सन्मान होणे आवश्यक होते. खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांना बळ देऊन त्यांच्याकडून समाजाची सेवा करण्यासाठी एक प्रकारची उर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे मी परत एकदा त्यांना सन्मानित करेल, असा शब्द अजित पवार यांनी दिला होता. अजित पवार हे कार्यकर्त्यांना न्याय देतात. त्यांना पाठिंबा देतात. कार्यकर्त्यांचे महत्त्व वाढवतात. त्यामुळे अजित पवार यांच्या सारखा नेता या महाराष्ट्रात होणे शक्य नाही, असे मत वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.
