Pune Zp. election 2025 :- पुणे जिल्ह्यातील गट आणि गणांच्या नव्या रचनेवर तब्बल २१७ हरकती दाखल! 

पुणे जिल्ह्यात खेड तालुक्यातून सर्वाधिक ८७ हरकती : विभागीय आयुक्तांपुढे सुनावणी होणार 

Pune Zp. election 2025 :- पुणे जिल्ह्यातील गट आणि गणांच्या नव्या रचनेवर तब्बल २१७ हरकती दाखल! 
पुणे:- पुणे जिल्हा परिषद लोगो

डॉ. गजेंद्र बडे : ग्रामराज्य वृत्तसेवा

पुणे, दि. २२ जुलै २०२५ :- जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वातावरण पुणे जिल्ह्यात आता हळूहळू तापू लागले आहे. या निवडणुकीला सुमारे तीन वर्षांचा खंड पडल्यामुळे आतापर्यंत थंडावलेले सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते आता खडबडून जागे झाले आहेत. यातूनच जिल्हा परिषद गट व पंचायत समित्यांच्या गणांच्या नव्या रचनेला जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे. यासाठी गट आणि गणांच्या नव्या रचनेला आक्षेप घेणाऱ्या तब्बल २१७ हरकती व सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने तीन वर्षांच्या खंडानंतर यंदा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेतील पहिला टप्पा हा गट आणि गणांच्या रचनेचा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने ही रचना करुन, आठवडापुर्वीच ती जाहीर केली आहे. शिवाय या नव्या रचनेबाबत हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. यासाठी दि. २१ जुलै २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत काल (सोमवारी) संपली. 

दरम्यान, जिल्ह्यातून सर्वाधिक हरकती व सूचना खेड (राजगुरुनगर) तालुक्यातून प्राप्त झालेल्या असून दुसऱ्या क्रमांकावर हवेली तालुका आहे. खेड पाठोपाठ हवेली तालुक्यातून ६२ हरकती दाखल झाल्या आहेत. याशिवाय पुरंदर तालुक्यातून मात्र केवळ १ हरकत घेण्यात आलेली आहे. 

या प्राप्त झालेल्या हरकती व सूचना विभागीय आयुक्त कार्यालयांकडे सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला येत्या २८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यालयाच्या वतीने या सर्व हरकती व सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. या सर्व प्राप्त हरकती व सूचनांवर विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्याकडे सुनावणी होणार आहे. या सुनावणी नंतर विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार गट व गणांची रचना अंतिम केली जाणार आहे. 

पुणे जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहाचा कार्यकाल हा दि. २० मार्च २०२२ तर, पंचायत समित्यांच्या सभागृहाचा कार्यकाल हा दि. १३ मार्च २०२२ रोजीच संपुष्टात आलेला आहे. तेव्हापासून पंचायतराज संस्थांवर प्रशासकराज सुरू आहे. तेव्हापासून गट विकास अधिकारी हे पंचायत समितीचे तर, मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. त्रेहत्तराव्या घटनादुरुस्तीनंतर महाराष्ट्रातील पंचायतराज संस्थांवर सर्वाधिक काळ प्रशासकराज असल्याची ही पहिलीच वेळ आहे. 

तालुक्यानिहाय प्राप्त हरकती व सूचना 

- जुन्नर ---०९
- आंबेगाव ---०५
- शिरूर ---१६
- खेड ---८७
- मावळ ---०५ 
- मुळशी ---१०
- हवेली ---६२
- दौंड ---०७
- पुरंदर ---०१ 
- बारामती ---०२
- भोर ---०२ 
- वेल्हे ---०२ 
- इंदापूर ---०९
- एकूण ---२१७

ऑगस्टच्या अखेरीस गट, गण अंतिम होणार?

दरम्यान, जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांच्या बाबतीत प्राप्त झालेल्या हरकतींची सुनावणी पूर्ण करण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना किमान एक महिना कालावधी लागणार आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी येत्या १ ऑगस्टपासून सुनावणी घेण्यास सुरुवात केली तरी, ती पूर्ण होण्यासाठी संपूर्ण ऑगस्ट महिना संपणार आहे. त्यामुळे इच्छुकांना गट आणि गणांची रचना अंतिम होण्यास ऑगस्टच्या अखेरपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.